
Image Source:(Internet)
मुंबई : रेल्वेच्या फर्स्ट एसी डब्यात नवविवाहित जोडप्यासाठी 'सुहागरात'प्रमाणे सजावट करण्यात आल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत रेल्वे प्रशासनाने संबंधित तिकीट तपासनीस (टीसी) याला तात्काळ निलंबित केले असून विभागीय चौकशीचे आदेश दिले आहेत.
रेल्वे मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, ६ जुलै २०२६ रोजी ट्रेन क्रमांक 11002 नंदीग्राम एक्सप्रेसने प्रवास करणाऱ्या एका नवविवाहित जोडप्याने फर्स्ट एसी केबिन सजवण्यासाठी खासगी डेकोरेटरची ऑनलाइन नियुक्ती केली होती. मात्र, संबंधित डेकोरेटरला कोणतीही अधिकृत परवानगी नसताना रेल्वेच्या डब्यात प्रवेश देण्यात आला. ही बाब सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन मानण्यात आली आहे.
घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर रेल्वे प्रशासनाने तातडीने चौकशी सुरू केली. प्राथमिक तपासात निष्काळजीपणा आढळल्याने संबंधित टीसीला तात्काळ निलंबित करण्यात आले आहे.
रेल्वेने स्पष्ट केले की, प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने कोणत्याही अनधिकृत व्यक्तीला रेल्वे डब्यात प्रवेश देणे अत्यंत गंभीर बाब आहे. या प्रकरणाची सखोल विभागीय चौकशी सुरू असून, तपास अहवालानुसार संबंधितांवर पुढील कठोर कारवाई करण्यात येणार आहे.