
Image Source:(Internet)
मुंबई : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंक प्रकल्पावरून सुरू असलेल्या वादाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत ठाम उत्तर दिले. प्रकल्पाबाबत सोशल मीडियावर जाणीवपूर्वक दिशाभूल केली जात असल्याचा आरोप करत त्यांनी विरोधकांसह टीकाकारांवर जोरदार हल्लाबोल केला.
चर्चेदरम्यान बोलताना फडणवीस म्हणाले, "माझ्यावर वैयक्तिक टीका करायची असेल तर जरूर करा, पण राज्याच्या विकासकामांबाबत खोटी माहिती पसरवून महाराष्ट्राची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न सहन केला जाणार नाही."
सोशल मीडियावर सुरू असलेल्या मोहिमेवर भाष्य करत त्यांनी काही जण आर्थिक मोबदल्यासाठी चुकीची माहिती पसरवत असल्याचा आरोप केला. "ज्यांना प्रत्यक्षात कोणी विचारत नाही, ते सोशल मीडियावर येऊन राज्य सरकार आणि मुख्यमंत्र्यांवर टीकेचा भडिमार करत आहेत," असा टोला त्यांनी लगावला.
मिसिंग लिंक प्रकल्पाची माहिती देताना मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, मुसळधार पावसामुळे भूस्खलन होऊन प्रकल्पाच्या कमानीचा काही भाग बाधित झाला होता. मात्र मुख्य संरचना सुरक्षित असून कोणत्याही प्रकारचे गंभीर नुकसान झालेले नाही.
फडणवीस म्हणाले, "घटना घडल्यानंतर अवघ्या १८ तासांत मार्ग पुन्हा वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. तरीही विरोधकांनी संपूर्ण प्रकल्प निकामी झाल्याचा आभास निर्माण करण्याचा प्रयत्न केला. वस्तुस्थिती वेगळी असताना दिशाभूल करणारे चित्र रंगवणे योग्य नाही."
मिसिंग लिंक हा राज्यातील महत्त्वाकांक्षी पायाभूत सुविधा प्रकल्प असून तो आधुनिक अभियांत्रिकीचा उत्कृष्ट नमुना असल्याचा पुनरुच्चार करत मुख्यमंत्र्यांनी विकासकामांवर राजकारण करू नये, असे आवाहन केले.
या मुद्द्यावरून विधानसभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक रंगली असून, मिसिंग लिंक प्रकल्पाचा वाद आणखी तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत.