
Image Source:(Internet)
वॉशिंग्टन : मध्यपूर्वेतील तणाव पुन्हा एकदा वाढण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबतचा करार संपुष्टात आल्याचे जाहीर करत, तेहरानशी पुढील कोणतीही चर्चा होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर पुन्हा संघर्ष तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
अंकारा येथे पत्रकारांशी संवाद साधताना ट्रम्प म्हणाले, "इराणसोबत आता कोणताही करार होणार नाही. आम्ही हा विषय संपवला आहे." इराणकडून कुवेत आणि बहरीनमधील अमेरिकी तळांवर हल्ले झाल्यानंतर त्यांनी ही भूमिका मांडली.
ट्रम्प यांनी इराणवर विश्वासघाताचा आरोप करत, "इराणने आमच्याशी प्रामाणिकपणे वागले नाही. त्यामुळे तेहरानशी पुढील वाटाघाटींचा प्रश्नच उद्भवत नाही. इराण अण्वस्त्रमुक्त करण्यासाठी अमेरिका आवश्यक ती पावले उचलेल," असेही सांगितले.
दुसरीकडे, इराणनेही अमेरिकेला प्रत्युत्तर देताना युद्धासाठी आपण सज्ज असल्याचे म्हटले आहे. होर्मुज सामुद्रधुनी परिसरात अमेरिकेने विश्वासघात केल्याचा आरोप करत, अशा परिस्थितीत अमेरिकेवर विश्वास ठेवणे शक्य नसल्याचे इराणी अधिकाऱ्यांनी म्हटले.
दरम्यान, ट्रम्प यांनी नाटो सदस्य राष्ट्रांवरही नाराजी व्यक्त केली. दहशतवादाविरोधातील कारवाईत अपेक्षित सहकार्य मिळत नसल्याची टीका त्यांनी केली.
याच पार्श्वभूमीवर तेहरानमध्ये झालेल्या एका अंत्ययात्रेदरम्यान काही कट्टरपंथी गटांनी ट्रम्पविरोधी घोषणाबाजी केल्याचे वृत्त आहे. तसेच अमेरिकेविरोधातही घोषणाबाजी करण्यात आली.
दरम्यान, अलीकडील घडामोडींमध्ये होर्मुज परिसरात जहाजांवरील हल्ल्यांनंतर अमेरिकेने इराणमधील काही ठिकाणांवर कारवाई केल्याचा दावा केला आहे. त्याला प्रत्युत्तर म्हणून इराणने कुवेत आणि बहरीनमधील अमेरिकी हितसंबंधांवर हल्ले केल्याचे वृत्त आहे. या घटनांमुळे मध्यपूर्वेतील सुरक्षा परिस्थिती अधिकच तणावपूर्ण बनली असून, आंतरराष्ट्रीय समुदायाचे लक्ष आता या संघर्षाकडे लागले आहे.