
Image Source:(Internet)
मुंबई : राज्यभर सुरू असलेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले असून अनेक भागांमध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. कोकणासह पश्चिम महाराष्ट्र आणि मुंबई परिसरात जोरदार पावसामुळे रस्ते जलमय झाले आहेत, तर अनेक नद्या धोक्याची पातळी ओलांडून वाहत असल्याने प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
गेल्या २४ तासांत पालघरमध्ये सर्वाधिक २०३.३ मिमी पावसाची नोंद झाली. त्यानंतर ठाणे ११६.४ मिमी, रायगड १०८.७ मिमी, मुंबई उपनगर ९०.४ मिमी आणि पुणे ७०.९ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
सततच्या पावसामुळे अंबा, सावित्री, जगबुडी, कुंडलिका आणि पिंजल या नद्यांच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली असून काही नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
दरम्यान, सातारा जिल्ह्यात भूस्खलन होऊन एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून भिंत कोसळल्याने चार जनावरे दगावली. नंदुरबारमध्ये वीज पडून एका व्यक्तीचा मृत्यू झाला. तर ठाणे आणि मुंबईत झाडे कोसळण्याच्या घटनांमध्ये एक जण जखमी झाला आहे. पालघरमध्ये पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने ११ जनावरे मृत्युमुखी पडल्याची माहिती प्रशासनाने दिली.
दरम्यान, भारतीय राष्ट्रीय महासागर माहिती सेवा केंद्राने (INCOIS) महाराष्ट्राच्या किनारपट्टीसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पालघर किनारपट्टीवर ४.८ ते ५ मीटर उंच लाटांची शक्यता वर्तविण्यात आली असून समुद्र खवळलेला राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे.
भारतीय हवामान विभागाने (IMD) नाशिक आणि पालघर जिल्ह्यांसाठी विशेष सतर्कतेचा इशारा दिला आहे. तसेच भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांसाठी पुढील २४ तासांसाठी ऑरेंज अलर्ट, तर विदर्भातील अनेक जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. प्रशासनाने नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा आणि स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन केले आहे.