आंबेगावमध्ये मुसळधार पावसाचा तडाखा; आदिवासी भागाचा संपर्क तुटला, भीमाशंकर-जुन्नर मार्ग बंद

    08-Jul-2026
Total Views |
Image Source:(Internet)

पुणे : आंबेगाव तालुक्यातील आहुपे, भीमाशंकर आणि पाटण खोऱ्यात कोसळलेल्या संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अतिवृष्टीमुळे अनेक रस्ते व लहान-मोठे पूल पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला असून नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

कुशिरे-भोईरवाडी घाटरस्त्यावर दरड कोसळल्याने काही काळ वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. घोडेगाव पोलिसांनी तातडीने यंत्रणेच्या मदतीने रस्ता मोकळा करून वाहतूक पूर्ववत केली. मात्र, खबरदारीचा उपाय म्हणून घोडेगाव-भीमाशंकर आणि घोडेगाव-जुन्नर हे दोन्ही प्रमुख मार्ग तात्पुरते बंद ठेवण्यात आले आहेत.

घोड नदी आणि बुब्रा नदीला आलेल्या पुरामुळे परिसरातील ओढे-नाले तुडुंब भरून वाहत आहेत. त्यामुळे डिंभा, शिनोली, शिंदेवाडी, गोनवडी, घोडेगाव, नारोडी, पिंपळगाव घोडे, चिंचोडी, चिंचोली आणि कोलदरेसह अनेक गावांमध्ये ये-जा विस्कळीत झाली आहे. नदीकाठावरील स्मशानभूमीदेखील पुराच्या पाण्याखाली गेल्या आहेत.

दरम्यान, डिंभा धरणाच्या पाणीसाठ्यातही झपाट्याने वाढ झाली आहे. अवघ्या २४ तासांत धरणाची पातळी २३ टक्क्यांवरून ३७ टक्क्यांपर्यंत पोहोचली असून सध्या धरणात ५.६५ टीएमसी पाणीसाठा आहे. मुसळधार पावसामुळे शेतातील भात लागवडीचे मोठे नुकसान झाले असून अनेक ठिकाणी बांध फुटल्याने शेती पाण्याखाली गेली आहे.

परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन प्रशासन सतर्क झाले आहे. प्रांताधिकारी अर्चना तांबे यांनी सर्व संबंधित विभागांना तातडीने मदत व बचावकार्याचे आदेश दिले आहेत. घोडेगावचे पोलीस निरीक्षक सागर पवार यांनी पोलिसांच्या पथकासह पहाटेपासून पूरग्रस्त भागात पाहणी करत नागरिकांना सुरक्षितस्थळी जाण्यास मदत केली. प्रशासनाने नागरिकांना विनाकारण पूरग्रस्त भागात न जाण्याचे आणि अधिकृत सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.