Image Source:(Internet)
मुंबई : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या (KDMC) शास्त्रीनगर रुग्णालयात डॉक्टर आणि परिचारिकांशी कथित गैरवर्तन व मारहाणीच्या घटनेनंतर राजकीय वर्तुळातही खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दोषींवर कठोर कारवाईचा इशारा दिला आहे.
प्रसूतीसाठी दाखल झालेल्या एका महिलेच्या उपचारादरम्यान झालेल्या वादातून हा प्रकार घडल्याचे सांगितले जात आहे. या घटनेत शिंदे सेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रे आणि त्यांच्या काही कार्यकर्त्यांनी डॉक्टर व परिचारिकांशी अयोग्य वर्तन केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या.
या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, कायदा हातात घेणाऱ्यांना कोणतीही सवलत दिली जाणार नाही, असे श्रीकांत शिंदे यांनी स्पष्ट केले. तसेच घटनेत सहभागी असलेल्या व्यक्तींवर पक्षाच्या स्तरावरही शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वरील पोस्टद्वारे जाहीर केले.
डॉक्टर, परिचारिका आणि आरोग्य कर्मचारी हे रुग्णसेवेसाठी दिवस-रात्र कार्यरत असतात. त्यामुळे त्यांच्या सुरक्षिततेचा आणि सन्मानाचा आदर राखणे प्रत्येकाची जबाबदारी आहे, असे शिंदे यांनी नमूद केले. स्वतः वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित असल्याने आरोग्य कर्मचाऱ्यांच्या कामाचे महत्त्व आणि त्यांच्यासमोरील आव्हाने आपल्याला चांगलीच माहिती असल्याचेही त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.