दिल्लीत शाह-फडणवीस यांची तीन तास खलबते; महाराष्ट्रातील राजकीय समीकरणांवर चर्चेची शक्यता!

    08-Jul-2026
Total Views |
Image Source:(Internet)

नवी दिल्ली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्ली दौऱ्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. नर्मदा प्रकल्पासंदर्भातील बैठकीनंतर दोन्ही नेत्यांमध्ये स्वतंत्रपणे सुमारे तीन तास चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, मंगळवारी सायंकाळी सुमारे 7 ते 10 या वेळेत झालेल्या या बैठकीत महाराष्ट्रातील सध्याची राजकीय परिस्थिती, महायुती सरकारमधील घडामोडी, तसेच आगामी काळातील राजकीय रणनीतीवर विचारविनिमय करण्यात आला. मंत्रिमंडळ विस्तार आणि संघटनात्मक विषयांवरही चर्चा झाल्याचे बोलले जात आहे. मात्र, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

यापूर्वी अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली नर्मदा प्रकल्पासंदर्भात बैठक झाली. या बैठकीला गुजरातचे मुख्यमंत्रीही उपस्थित होते. महाराष्ट्राला नर्मदा नदीचे पाणी उपलब्ध करून देण्याच्या प्रस्तावावर या बैठकीत चर्चा झाली.

दरम्यान, राज्यातील बदलत्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर या बैठकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील काही खासदारांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर राज्यातील राजकीय समीकरणे बदलत असल्याची चर्चा सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर पुढील राजकीय घडामोडींबाबतही दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

केंद्र सरकारच्या संभाव्य मंत्रिमंडळ फेरबदलाचाही या बैठकीत उल्लेख झाल्याची चर्चा आहे. महाराष्ट्रातील काही नेत्यांना केंद्रीय मंत्रिमंडळात संधी मिळू शकते, अशी राजकीय वर्तुळात चर्चा असली तरी याबाबत अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.