
Image Source:(Internet)
पिंपरी-चिंचवडच्या मोशी परिसरातील 'वेस्ट टू एनर्जी' प्रकल्पात बुधवारी दुपारी भीषण दुर्घटना घडली. मुसळधार पावसामुळे कचऱ्याचा प्रचंड ढिगारा घसरून प्रकल्पाच्या इमारतीवर कोसळल्याने मोठा अपघात झाला. प्राथमिक माहितीनुसार, या दुर्घटनेत पाच कामगारांचा मृत्यू झाला असून, आणखी काही जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे कचऱ्याच्या ढिगाऱ्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. त्यामुळे ढिगाऱ्याचे वजन वाढून तो अचानक घसरला आणि थेट इमारतीवर आदळला. या धडकेमुळे इमारतीचा काही भाग कोसळला. त्यावेळी कामावर असलेले कर्मचारी ढिगाऱ्याखाली अडकल्याने मोठी जीवितहानी झाली.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थापन पथक, पोलीस आणि महापालिका प्रशासन तातडीने घटनास्थळी दाखल झाले. जेसीबी, पोकलेन आणि इतर यंत्रसामग्रीच्या मदतीने बचावकार्य सुरू आहे. कचऱ्याचा मोठा ढिगारा आणि सुरू असलेला पाऊस यामुळे मदतकार्यात अडथळे येत असले तरी अडकलेल्या कामगारांचा शोध घेण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.
आषाढी वारीच्या बंदोबस्तासाठी पोलीस दलाचा मोठा फौजफाटा इतर ठिकाणी तैनात असल्याने अतिरिक्त मनुष्यबळ घटनास्थळी पाठविण्यात आले आहे. दरम्यान, मृतांचा अंतिम आकडा, ढिगाऱ्याखाली अडकलेल्या कामगारांची संख्या आणि दुर्घटनेमागील नेमके कारण याबाबत प्रशासनाकडून अधिकृत माहितीची प्रतीक्षा आहे.