नागपुरात गूढ वाढलं! एकाच कुटुंबातील पाच जण बेपत्ता; मोबाईलचे शेवटचे लोकेशन पुण्यात

    06-Jul-2026
Total Views |
Image Source:(Internet)

नागपूर : शहरातील धंतोली परिसरातून एकाच कुटुंबातील पाच सदस्य अचानक बेपत्ता झाल्याची धक्कादायक घटना समोर आली असून, या प्रकरणामुळे परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. २४ जूनपासून या कुटुंबातील सदस्यांचा कोणताही संपर्क झालेला नसल्याने धंतोली पोलिसांनी बेपत्ता व्यक्तींचा शोध सुरू केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दिवंगत सुरेश परसवानी यांच्या कुटुंबातील ५७ वर्षीय हर्षा परसवानी, ४२ वर्षीय जितेंद्र परसवानी, ४० वर्षीय इशिता परसवानी, २१ वर्षीय खुशी आणि १२ वर्षीय कृष्णा हे एकाच दिवशी घरातून बाहेर पडले. त्यानंतर ते परत आले नसल्याने नातेवाईकांनी सर्वत्र शोध घेतला. मात्र कोणताही ठावठिकाणा न लागल्याने श्यामसुंदर परसवानी यांनी धंतोली पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली.

तपासादरम्यान पोलिसांना या कुटुंबातील सदस्यांच्या मोबाईलचे शेवटचे लोकेशन पुणे येथे आढळले आहे. त्यानंतर त्यांनी कुठे प्रवास केला किंवा त्यांच्यासोबत नेमके काय घडले, याचा शोध पोलीस घेत आहेत.

प्राथमिक माहितीनुसार, कुटुंबातील एका सदस्यावर मोठे कर्ज असल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे आर्थिक अडचणींमुळे कुटुंबाने घर सोडल्याची शक्यता व्यक्त केली जात असली, तरी पोलिसांनी कोणताही निष्कर्ष काढलेला नाही. सर्व शक्यतांचा तपास सुरू असून बेपत्ता कुटुंबाचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत.