नागरिकांनो सतर्क; राज्यात अतिवृष्टीचा इशारा, अनेक जिल्ह्यांतील शाळा-महाविद्यालयांना आज सुट्टी!

    06-Jul-2026
Total Views |
Image Source:(Internet)

मुंबई: राज्यभर मान्सूनचा जोर कायम असून अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विशेषतः कोकण, घाटमाथा आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांत अतिवृष्टीची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा विचार करून राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये आज (6 जुलै) शाळा आणि काही ठिकाणी महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

भारतीय हवामान विभागाने (IMD) उत्तर कोकणातील मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांसह अनेक भागांसाठी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा जारी केला आहे. दक्षिण मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरातही पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज वर्तवण्यात आला असून जनजीवनावर परिणाम होण्याची शक्यता आहे.

रायगड तसेच नाशिक, पुणे आणि सातारा जिल्ह्यांच्या घाट भागांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. या भागांमध्ये काही ठिकाणी अत्यंत तीव्र स्वरूपाचा पाऊस कोसळण्याची शक्यता असून विजांचा कडकडाट, मेघगर्जना आणि ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. मराठवाड्यातही हलका ते मध्यम पाऊस, विजांचा कडकडाट आणि वेगवान वाऱ्यांचा इशारा देण्यात आला आहे. मुंबई, पालघर, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक आणि कोल्हापूरच्या घाट परिसरासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

अनेक जिल्ह्यांमध्ये शाळा-महाविद्यालयांना सुट्टी
अतिवृष्टीचा धोका लक्षात घेऊन मुंबईतील सर्व शासकीय, खासगी आणि महानगरपालिका शाळा तसेच महाविद्यालये आज बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र शासकीय व खासगी कार्यालये नियमित सुरू राहणार असून अत्यावश्यक कामाशिवाय नागरिकांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. मुंबई विद्यापीठानेही आज होणाऱ्या सर्व परीक्षा पुढे ढकलल्या असून सुधारित वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.

ठाणे जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालये, कल्याण-डोंबिवली महानगरपालिका हद्दीतील शैक्षणिक संस्था, नवी मुंबई आणि भिवंडी येथील सर्व शाळा-महाविद्यालयांनाही सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. पालघर जिल्ह्यात स्थानिक परिस्थितीनुसार प्राथमिक व माध्यमिक शाळांना सुट्टी देण्याचे अधिकार मुख्याध्यापकांना देण्यात आले आहेत.

रायगड जिल्ह्यात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाल्याने सर्व शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. पुणे जिल्ह्यासाठी रेड अलर्ट घोषित झाल्याने तेथील सर्व शाळांनाही आज सुट्टी देण्यात आली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्याचे आदेश जारी केले आहेत.

नागरिकांना प्रशासनाचे आवाहन-
प्रशासनाने नागरिकांना नदी-नाले, समुद्रकिनारे आणि डोंगराळ भागांपासून सुरक्षित अंतर राखण्याचे आवाहन केले आहे. अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करावे आणि स्थानिक प्रशासनाने दिलेल्या सूचना तातडीने पाळाव्यात, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.