
Image Source:(Internet)
चंद्रपूर : राम मंदिरातील कथित देणगी गैरव्यवहाराच्या मुद्द्यावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने जाहीर केलेल्या 'रामरक्षा आंदोलनावर' मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपरोधिक प्रतिक्रिया दिली आहे. चंद्रपुरात पत्रकारांशी बोलताना त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधत, श्रीरामांपासून दूर गेल्यामुळेच त्यांच्या पक्षाची आजची परिस्थिती निर्माण झाल्याचा दावा केला.
मुख्यमंत्री म्हणाले, "उद्धव ठाकरे यांना आता प्रभू श्रीरामांचे स्मरण झाले, याचे स्वागतच आहे. त्यांनी यापुढेही श्रीरामांचा आदर्श स्वीकारावा. केवळ आंदोलनाच्या दिवशी नव्हे, तर दररोज रामरक्षा स्तोत्राचे पठण केले, तर त्यांच्यासाठी ते अधिक लाभदायक ठरेल."
अयोध्येतील राम मंदिराच्या दानपेटीतील कथित अनियमिततेच्या निषेधार्थ उद्धव ठाकरे यांनी 'रामरक्षा आंदोलन' छेडण्याची घोषणा केली आहे. या आंदोलनात रामरक्षा स्तोत्र, हनुमान स्तोत्र आणि हनुमान चालीसाचे सामूहिक पठण करून निषेध नोंदविण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
या आंदोलनाची घोषणा करताना उद्धव ठाकरे यांनी राम मंदिरातील कथित गैरव्यवहाराबाबत प्रश्न उपस्थित करत दोषींवर कारवाईची मागणी केली होती. त्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रत्युत्तर देत श्रीरामांच्या नावावरूनच उद्धव ठाकरे यांच्यावर राजकीय टीका केली. त्यामुळे या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले आहे.