हिंदुत्वाचा मार्ग सोडू नका;रामरक्षा आंदोलनाच्या घोषणेवरून बावनकुळेंची उद्धव ठाकरेंवर टीका

    04-Jul-2026
Total Views |
Image Source:(Internet)

नागपूर : अयोध्येतील राम मंदिराच्या बांधकामातील कथित अनियमितता आणि दानपेटी चोरीच्या प्रकरणाच्या निषेधार्थ शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने 5 जुलै रोजी राज्यभर 'घंटानाद' व 'रामरक्षा आंदोलन' करण्याचा निर्णय घेतला आहे. या घोषणेनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली.

नागपुरात पत्रकार परिषदेत बोलताना बावनकुळे म्हणाले की, "उद्धव ठाकरे आता रामाच्या मुद्द्यावर बोलू लागले, ही स्वागतार्ह बाब आहे. मात्र त्यांनी ही भूमिका केवळ राजकारणापुरती न ठेवता सातत्याने जपली पाहिजे."

ते पुढे म्हणाले की, अयोध्येला जाण्याबाबत देशभरातून मागणी होत असतानाही उद्धव ठाकरे यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. काँग्रेससोबतची आघाडी अबाधित राहावी म्हणून त्यांनी हिंदुत्वाच्या भूमिकेपासून दूर गेल्याचा आरोपही त्यांनी केला.

बावनकुळे यांनी असा दावा केला की, पक्षातील अनेक नेते आणि कार्यकर्ते नाराज असल्याने त्यांना पुन्हा हिंदुत्वाची भूमिका घ्यावी लागत आहे. तसेच, हनुमान चालीसा प्रकरणाचा संदर्भ देत त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

"उशिरा का होईना त्यांना रामाची आठवण झाली आहे. मात्र ही भूमिका कायम ठेवावी, अन्यथा ते पुन्हा जुन्याच राजकीय वाटेवर जातील," असा टोला बावनकुळे यांनी लगावला.