
Image Source:(Internet)
जळगाव: जिल्ह्यातील अमळनेर शहरात मुसळधार पावसामुळे आलेल्या पुरात एक महिन्याच्या बाळासह संपूर्ण कुटुंब घरात अडकून पडले होते. घरात वेगाने पाणी शिरल्याने जीवघेणी परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र, नगरपालिकेच्या आरोग्य विभाग आणि अग्निशमन दलाने धाडसी बचाव मोहीम राबवत सर्वांची सुखरूप सुटका केली.
अमळनेरमधील भालेराव नगर परिसरातील गुरुकृपा कॉलनीत नाल्याला आलेल्या पुरामुळे छातीएवढे पाणी साचले. यामुळे एका घरात एक महिन्याचे बाळ, त्याची आई, तीन महिला, तीन लहान मुले आणि इतर कुटुंबीय अडकून पडले. घरात पाणी शिरल्याने सर्वांनी उंच जागेवर आश्रय घेत मदतीची वाट पाहिली.
घटनेची माहिती मिळताच मुख्याधिकारी गणेश शिंदे यांच्या निर्देशानुसार आरोग्य निरीक्षक किरण कंडारे, गोल्डी बिऱ्हाडे तसेच अग्निशमन दलाचे फारुख शेख, दिनेश बिऱ्हाडे, भिका सदानंदशीव आणि पवन बिऱ्हाडे यांचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले.
पाण्याचा वेग प्रचंड असल्याने दोर, लाइफ जॅकेट आणि मानवी साखळीच्या सहाय्याने जवळपास दोन तास अथक प्रयत्न करण्यात आले. अखेर बचाव पथकाने कुटुंबापर्यंत पोहोचत सर्वांना सुरक्षित बाहेर काढले.
या बचाव मोहिमेतील सर्वात भावनिक क्षण म्हणजे अवघ्या एक महिन्याच्या बाळाला प्लास्टिकच्या टबमध्ये सुरक्षित ठेवून पुराच्या पाण्यातून बाहेर आणण्यात आले. त्यानंतर बाळासह सर्व कुटुंबीयांना जवळील इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर सुरक्षितस्थळी हलविण्यात आले.
आरोग्य विभाग आणि अग्निशमन दलाच्या या धाडसी आणि तत्पर बचावकार्याचे परिसरात सर्वत्र कौतुक होत आहे.