येत्या 24 तासात महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा; घाटमाथ्यावर रेड अलर्ट

    31-Jul-2026
Total Views |
Image Source:(Internet)

मुंबई: महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा जोर अद्याप कायम असून, पुढील 24 तास राज्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असल्याचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे. मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी जोरदार ते अतिमुसळधार पावसाची नोंद झाली आहे. पूर्व विदर्भात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचा प्रभाव अद्याप कायम असल्याने राज्यातील अनेक भागांत पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

हवामान विभागाचे शास्त्रज्ञ एस. डी. सानप यांनी सांगितले की, पुणे आणि सातारा जिल्ह्यातील घाटमाथा परिसरासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला असून, पुणे शहरासाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे. रविवारनंतर पावसाचा जोर काहीसा कमी होण्याची शक्यता असली, तरी पुढील 24 तास नागरिकांनी विशेष खबरदारी घेणे आवश्यक आहे.

सततच्या पावसामुळे घाटमाथा परिसरात दरडी कोसळण्याचा धोका वाढला आहे. त्यामुळे नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा, घाट रस्त्यांवरून प्रवास करताना अधिक सावधगिरी बाळगावी आणि स्थानिक प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

दरम्यान, धुळे जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. शहरासह ग्रामीण भागातील अनेक सखल भागांमध्ये पाणी साचल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. अतिवृष्टीचा इशारा लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने प्राथमिक आणि माध्यमिक शाळांना स्थानिक परिस्थितीनुसार सुट्टी जाहीर करण्याचे निर्देश दिले आहेत.

सततच्या पावसामुळे शिरपूर तालुक्यातील अनेर धरणातील पाणीसाठ्यात वाढ झाल्याने धरणातून 4 हजार 921 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. अक्कलपाडा धरणातूनही पाणी सोडण्यात येत असल्याने नदीकाठच्या गावांतील नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नदी-नाले, पूरग्रस्त भाग आणि धोकादायक ठिकाणांपासून दूर राहावे, लहान मुलांवर विशेष लक्ष ठेवावे आणि कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

राज्यातील अनेक भागांमध्ये पुढील 24 तास मुसळधार पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता असल्याने आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. नागरिकांनी हवामान विभागाचे इशारे गांभीर्याने घेत सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे, असे आवाहन प्रशासन आणि हवामान विभागाने केले आहे.