भिवंडीत चार मजली इमारत जमीनदोस्त; ८ जणांचा मृत्यू, ढिगाऱ्याखाली आणखी नागरिक अडकल्याची भीती

    31-Jul-2026
Total Views |
Image Source:(Internet)

भिवंडी : ठाणे जिल्ह्यातील भिवंडी शहरातील भंडारी कंपाऊंड परिसरात शुक्रवारी पहाटे चार मजली निवासी इमारत अचानक कोसळून भीषण दुर्घटना घडली. या दुर्घटनेत आतापर्यंत ८ जणांचा मृत्यू झाला असून ३ जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात बचाव पथकांना यश आले आहे. मात्र, ढिगाऱ्याखाली अजूनही काही नागरिक अडकल्याची शक्यता असल्याने शोधमोहीम वेगाने सुरू आहे.

घटनेची माहिती मिळताच एनडीआरएफ, एसडीआरएफ, अग्निशमन दल आणि स्थानिक प्रशासनाची पथके तातडीने घटनास्थळी दाखल झाली. जड यंत्रसामग्रीच्या मदतीने ढिगारा हटविण्याचे काम सुरू असून, एका लहान मुलासह काही जण अडकल्याची शक्यता लक्षात घेऊन बचावकार्य अत्यंत काळजीपूर्वक केले जात आहे.

दुर्घटनेनंतर परिसरात शोककळा पसरली असून, नातेवाईकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली आहे. समीन नावाचा तरुण सलूनमधून पैसे ठेवण्यासाठी इमारतीत गेल्यानंतर काही क्षणांतच इमारत कोसळल्याची माहिती त्याच्या कुटुंबीयांनी दिली. त्याचा अद्यापही शोध लागलेला नसल्याने कुटुंबीयांची चिंता वाढली आहे.

प्रशासनाच्या माहितीनुसार, ढिगारा पूर्णपणे हटवल्यानंतरच मृत आणि जखमींचा अंतिम आकडा स्पष्ट होणार आहे. सध्या बचाव पथके जीव वाचविण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करत असून अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यावर भर दिला जात आहे.