
Image Source:(Internet)
सोलापूर : सोलापूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावरील शेळगी परिसरात शुक्रवारी पहाटे राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) बस आणि ट्रकमध्ये भीषण धडक होऊन झालेल्या अपघातात एसटी चालकासह एका महिला प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेत सुमारे १० प्रवासी जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मृतांमध्ये एसटी चालक दादाराव भालचंद्र बनसोडे (वय ४३) आणि प्रवासी नागुबाई राम रेवगे यांचा समावेश आहे. अपघाताची तीव्रता इतकी भीषण होती की बसच्या पुढील भागाचा चक्काचूर झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, ही एसटी बस पुणे जिल्ह्यातील कुरकुंभ येथून धाराशिव जिल्ह्यातील उमरग्याकडे निघाली होती. सोलापूर एसटी स्थानकावरून पुढील प्रवासासाठी बस निघाल्यानंतर काही अंतरावर शेळगीजवळ ट्रकची समोरासमोर धडक झाली आणि हा भीषण अपघात घडला.
घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि आपत्कालीन यंत्रणा तातडीने घटनास्थळी दाखल झाली. जखमींना त्वरित रुग्णालयात दाखल करण्यात आले असून अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू आहे.