महाराष्ट्रात ४० लाख कथित बांगलादेशींची नोंद? किरीट सोमय्यांचा गंभीर आरोप

    31-Jul-2026
Total Views |
Image Source:(Internet)

वर्धा : भाजप नेते किरीट सोमय्या यांनी विशेष मतदार पडताळणी (SIR) प्रक्रियेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. राज्यात मोठ्या प्रमाणावर बनावट कागदपत्रांच्या आधारे कथित बांगलादेशी नागरिकांकडून एन्यूमरेशन फॉर्म भरले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. त्यांच्या दाव्यानुसार, महाराष्ट्रात आतापर्यंत सुमारे ४० लाख कथित बांगलादेशी नागरिकांनी अशा प्रकारे फॉर्म भरले आहेत.

वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे आयोजित पत्रकार परिषदेत सोमय्या यांनी सांगितले की, हिंगणघाट परिसरातही सुमारे ८ हजार संशयित व्यक्तींच्या नावाने एन्यूमरेशन फॉर्म भरल्याची माहिती त्यांच्या निदर्शनास आली आहे. या व्यक्ती स्थानिक रहिवासी नसून त्यांचा मूळ संबंध बांगलादेशाशी असल्याचा दावा त्यांनी केला.

या कथित गैरप्रकाराची दखल घेऊन संबंधित निवडणूक यंत्रणेकडे अधिकृत आक्षेप नोंदविण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्राच्या मतदार यादीत एकही कथित बांगलादेशी मतदार राहू देणार नाही, अशी भूमिका त्यांनी मांडली.

सोमय्या यांनी सांगितले की, विशेष मतदार पडताळणी (SIR) मोहीम अंतिम टप्प्यात असून एन्यूमरेशन फॉर्म भरण्यासाठी केवळ आठ दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. अद्याप सुमारे ३० टक्के मतदारांनी फॉर्म भरले नसल्याने सर्व पात्र नागरिकांनी मुदतीपूर्वी आपले फॉर्म भरावेत, असे आवाहन त्यांनी केले.