राज्यात पुन्हा पावसाचा जोर; ३१ जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा, विदर्भातही मुसळधार सरींचा अंदाज

    30-Jul-2026
Total Views |
Image Source:(Internet)

मुंबई : राज्यात मान्सूनने पुन्हा जोर पकडला असून बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पुढील दोन दिवस पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने ३१ जुलैपर्यंत राज्यातील अनेक भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करत ३१ जिल्ह्यांसाठी इशारे जारी केले आहेत.

कोकण, गोवा आणि घाटमाथ्याच्या भागात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता असून ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने वारे वाहू शकतात. मराठवाडा, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि घाट परिसरात काही ठिकाणी वाऱ्यांचा वेग ताशी ६० किलोमीटरपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. उत्तर मध्य महाराष्ट्रातही मध्यम ते जोरदार पावसाच्या सरींचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

राज्यातील बदलत्या हवामानाचा विचार करून ११ जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट, तर २० जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. रायगड, जळगाव, पुणे, सातारा, कोल्हापूरच्या घाट भागांसह छत्रपती संभाजीनगर, जालना, अमरावती, भंडारा, नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरीसह इतर अनेक जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट लागू करण्यात आला असून पुढील दोन दिवस पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. संभाव्य पूरस्थिती लक्षात घेता प्रशासनाने यंत्रणा सतर्क ठेवली असून नागरिकांनी नदी-नाले, धोकादायक घाटमार्ग आणि पाण्याखाली जाणारे रस्ते टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.