
Image Source:(Internet)
मुंबई : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना २००९ च्या लोकसभा निवडणुकीदरम्यानच्या एका जुन्या प्रकरणात कल्याण न्यायालयाने समन्स बजावले आहे. न्यायालयाने ठाकरे यांना ५ ऑगस्ट रोजी प्रत्यक्ष हजर राहण्याचे निर्देश दिले असून, ते स्वतः न्यायालयात उपस्थित राहणार की वकिलामार्फत बाजू मांडणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
हे प्रकरण २००९ च्या कल्याण लोकसभा मतदारसंघातील निवडणूक प्रचाराशी संबंधित आहे. त्यावेळी शिवसेनेचे उमेदवार आनंद परांजपे यांच्या प्रचारसभेत तत्कालीन शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार वसंत डावखरे यांचा कथित व्हिडिओ सार्वजनिकरित्या दाखवला होता. या व्हिडिओमध्ये डावखरे कार्यकर्त्यांना निवडणूक जिंकण्यासाठी पोलिस व निवडणूक अधिकाऱ्यांची भीती न बाळगण्याचे आवाहन करत असल्याचे दाखवण्यात आले होते.
मात्र, वसंत डावखरे यांनी हा व्हिडिओ बनावट आणि संपादित (मॉर्फ) करण्यात आल्याचा आरोप करत त्यातील मजकूरामुळे आपली बदनामी झाल्याचा दावा केला होता. याप्रकरणी त्यांनी उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे, आनंद परांजपे आणि रमाकांत देवळेकर यांच्याविरोधात न्यायालयात तक्रार दाखल केली होती.
दरम्यान, या प्रकरणातील मुख्य तक्रारदार वसंत डावखरे यांचे निधन झाले आहे. त्यामुळे पुढील सुनावणीदरम्यान या खटल्याची दिशा काय राहणार, तसेच डावखरे कुटुंबीयांची भूमिका काय असेल, याकडेही लक्ष लागले आहे.
आता ५ ऑगस्ट रोजी होणाऱ्या सुनावणीत उद्धव ठाकरे यांची भूमिका आणि न्यायालयातील पुढील प्रक्रिया स्पष्ट होण्याची शक्यता आहे.