गुवाहाटी प्रशिक्षण दौऱ्यावरून उल्हासनगर महापालिकेत वाद; ६५ लाखांच्या खर्चावर प्रश्नचिन्ह

    30-Jul-2026
Total Views |
Image Source:(Internet)

उल्हासनगर: उल्हासनगर महापालिकेच्या नवनिर्वाचित नगरसेवकांसाठी आसाममधील गुवाहाटी येथे आयोजित करण्यात आलेल्या पाच दिवसीय प्रशिक्षण शिबिरावर झालेल्या सुमारे ६५ लाख रुपयांच्या खर्चावरून राजकीय वाद निर्माण झाला आहे. महापालिकेची आर्थिक परिस्थिती बिकट असताना एवढा मोठा खर्च का करण्यात आला, तसेच नगरसेवकांसोबत गेलेल्या त्यांच्या कुटुंबीयांचा खर्च नेमका कुणी केला, असा सवाल विरोधकांनी उपस्थित केला आहे.

अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या वतीने २२ ते २६ जुलै दरम्यान गुवाहाटी येथे प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले होते. ७६ पैकी ७१ नगरसेवकांनी प्रशिक्षणासाठी संमती दिल्यानंतर त्यांच्या प्रवास, निवास आणि भत्त्याचा खर्च महापालिकेने उचलल्याचे सांगितले जाते.

मात्र या दौऱ्यात अनेक नगरसेवक आपल्या कुटुंबीयांसह आणि नातेवाईकांसह गेल्याचे फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नव्या वादाला तोंड फुटले आहे. प्रशिक्षण शिबिराचे फोटो समोर आले नसताना पर्यटन आणि दर्शनाचे फोटो अधिक चर्चेत आल्याने विरोधकांनी पारदर्शकतेवर प्रश्न उपस्थित केले आहेत.

दौऱ्यादरम्यान शिंदेसेनेचे कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे विमानातील व्हिडिओमध्ये दिसल्याचे सांगितले जात आहे. याबाबत सभागृह नेते अरुण अशान यांनी ते कामाख्या देवीच्या दर्शनासाठी गेले होते, असे स्पष्टीकरण दिले.

याशिवाय, नगरसेवक आणि त्यांच्या कुटुंबीयांनी गुवाहाटीतील त्याच आलिशान हॉटेलमध्ये मुक्काम केल्याची माहिती समोर आली आहे, जिथे २०२२ मधील राजकीय घडामोडीदरम्यान बंडखोर आमदार थांबले होते.

दरम्यान, महापालिकेच्या प्रसिद्धीपत्रकात गुवाहाटी येथे ६० ते ७० नगरसेवक प्रशिक्षणासाठी गेल्याचा उल्लेख असून, नेमकी संख्या स्पष्ट करण्यात आलेली नाही. नगरसेवकांसोबत गेलेल्या कुटुंबीयांचा सर्व खर्च संबंधित नगरसेवकांनी स्वतःच्या खिशातून केल्याचा दावा सभागृह नेते अरुण अशान यांनी केला आहे.

महापौर अश्विनी निकम यांनीही प्रशिक्षणासाठी नगरसेवकांचा अधिकृत खर्च महापालिकेने केला असून, कुटुंबीयांचा खर्च संबंधित नगरसेवकांनी स्वतः केला असल्याचे सांगितले. त्यांनी प्रशिक्षणाचा उद्देश नगरसेवकांना प्रशासकीय कामकाज व विकासकामांची माहिती देणे हा असल्याचे स्पष्ट केले.

मात्र विरोधी पक्षनेत्या अंजली साळवे यांनी या दौऱ्याची गरजच उपस्थित केली आहे. "महाराष्ट्रात किंवा मुंबईतही असे प्रशिक्षण देता आले असते. ६५ लाखांचा खर्च करून गुवाहाटीला जाण्याचे औचित्य काय? तसेच नगरसेवकांच्या कुटुंबीयांचा खर्च कुणी केला, याची संपूर्ण माहिती आणि खर्चाचा तपशील जाहीर करावा," अशी मागणी त्यांनी केली आहे.

या प्रकरणामुळे महापालिकेच्या आर्थिक व्यवस्थापनाबरोबरच प्रशिक्षण दौऱ्याच्या पारदर्शकतेबाबतही प्रश्न उपस्थित होत असून, यावर प्रशासनाकडून अधिकृत खुलासा होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.