नागपुरातील विक्रमी पावसावर मुख्यमंत्र्यांचे भाष्य; बदलत्या हवामानामुळे शहराच्या नियोजनासमोर नवे आव्हान

    30-Jul-2026
Total Views |
Image Source:(Internet)

नागपूर : मंगळवारी नागपुरात झालेल्या विक्रमी मुसळधार पावसानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बदलत्या हवामानामुळे शहरांच्या पायाभूत सुविधांवर नव्याने विचार करण्याची गरज व्यक्त केली. यावेळी त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावरही टीका करत, देशात अस्थिरतेचे वातावरण निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याचा आरोप केला.

मुख्यमंत्री म्हणाले की, नागपुरात एका दिवसात १८६ मिमी पावसाची नोंद झाली असून त्यापैकी ११० मिमी पाऊस अवघ्या सव्वा तासात कोसळला. एवढ्या अल्पावधीत झालेल्या पावसामुळे शहरातील अनेक सखल भाग जलमय झाले आणि नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला.

शहरातील काही भागांत सुरू असलेल्या विकासकामांमुळे पाण्याचा निचरा प्रभावित झाला असला, तरी सर्वत्र तीच परिस्थिती नव्हती, असे स्पष्ट करत फडणवीस म्हणाले की, विद्यमान जलनिस्सारण व्यवस्था जुन्या पावसाच्या आकडेवारीवर आधारित आहे. मात्र, बदलत्या हवामानामुळे कमी वेळात अतिवृष्टी होत असल्याने अशा परिस्थितीसाठी अधिक सक्षम व्यवस्था उभारण्याची गरज निर्माण झाली आहे.

राहुल गांधी यांच्या वक्तव्यांवर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री म्हणाले की, देशातील तरुणांच्या प्रश्नांवर सकारात्मक भूमिका घेण्याऐवजी सतत आरोप-प्रत्यारोपाचे राजकारण केले जात आहे. अराजकतेचे वातावरण निर्माण करणे हा त्यांचा राजकीय अजेंडा असल्याची टीकाही त्यांनी केली.

याशिवाय मराठा समाजासाठी राज्य सरकारने आतापर्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याचा दावा करत, जात प्रमाणपत्रासंदर्भातील उर्वरित प्रश्नही सोडवले जातील, अशी ग्वाही त्यांनी दिली. तसेच पीक विमा योजनेतील गैरप्रकार रोखण्यासाठी नियमांमध्ये सुधारणा केल्यामुळे आता शेतकऱ्यांकडून पुन्हा हिस्सा घेतला जात असून, त्यामुळे विमा घेणाऱ्यांची संख्या कमी झाल्याचेही त्यांनी सांगितले.