अमित शाहांनी राजीनामा द्यावा; अभिजीत दीपकेंचा थेट हल्लाबोल

    30-Jul-2026
Total Views |
Image Source:(Internet)

छत्रपती संभाजीनगर: कॉकरोच जनता पार्टीचे (CJP) संस्थापक अभिजीत दीपके यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर जोरदार टीका करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित गोळीबारासाठी केंद्रीय गृहमंत्री जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला.

छत्रपती संभाजीनगर येथे माध्यमांशी संवाद साधताना दीपके म्हणाले, "आंदोलनावेळी विद्यार्थ्यांवर फायरिंग झाले. त्याची नैतिक जबाबदारी अमित शाह यांनी स्वीकारून राजीनामा द्यावा."

कॉकरोच जनता पार्टीला परदेशातून निधी मिळत असल्याचे आरोप होत असल्याचा उल्लेख करत त्यांनी केंद्र सरकारवरही निशाणा साधला. "जर गृहमंत्री अमित शाह यांच्या कार्यकाळात बाहेरून निधी येत असेल, तर ते त्यांच्या यंत्रणेचे अपयश आहे. मग स्वतःला 'चाणक्य' म्हणवून घेण्याचा अधिकार त्यांना नाही," अशी टीका त्यांनी केली.

दीपके यांनी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यावरही टीका करत, विद्यार्थ्यांशी संबंधित प्रश्नांवर सरकारची भूमिका आक्षेपार्ह असल्याचा आरोप केला.

"भाजपमध्ये जाणार नाही"
भाजपकडून ऑफर आल्याचा दावा करत दीपके म्हणाले, "कितीही ऑफर आली तरी मी भाजपमध्ये जाणार नाही. मला धमक्या दिल्या जात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी तरुणांना धमकावण्याऐवजी लोकशाहीचा आदर करावा."

देशातील बेरोजगारी, महागाई आणि शेतकरी प्रश्नांकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याचाही आरोप त्यांनी केला.

पोलिसांवरही गंभीर आरोप-
दिल्लीतील आंदोलनाचा उल्लेख करत दीपके यांनी पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. "पोलिसांनी संविधानानुसार वागावे. तसे शक्य नसेल तर त्यांनी भाजपच्या मुख्यालयासमोर जाऊन उभे राहावे," अशी टीका त्यांनी केली.

तसेच, आंदोलनापूर्वी दगडांनी भरलेला ट्रक घटनास्थळी आणण्यात आल्याचा दावा करत, "ही संपूर्ण कारवाई आधीच नियोजित होती का, याची चौकशी व्हावी," अशी मागणी त्यांनी केली.

शेतकऱ्यांच्या पाठिंब्याबद्दल आभार -
शेतकरी संघटनांनी आंदोलनाला दिलेल्या पाठिंब्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत दीपके म्हणाले, "मी स्वतः शेतकरी कुटुंबातून आलो आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आम्ही कायम त्यांच्या पाठीशी उभे राहू."

दरम्यान, अभिजीत दीपके यांनी केलेले आरोप हे त्यांचे वैयक्तिक दावे असून, संबंधित आरोपांवर केंद्र सरकार किंवा संबंधित यंत्रणांची अधिकृत प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही.