अजिंक्य रहाणेचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अखेरचा सलाम; सोशल मीडियावर निवृत्तीची घोषणा

    30-Jul-2026
Total Views |
Image Source:(Internet)

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणे याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय जाहीर केला आहे. सोशल मीडियावर एक भावनिक व्हिडीओ पोस्ट करत त्याने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीचा शेवट होत असल्याची माहिती चाहत्यांना दिली. अनेक वर्षे भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाल्याबद्दल त्याने बीसीसीआय, सहकारी खेळाडू, प्रशिक्षक, कुटुंबीय आणि चाहत्यांचे आभार मानले.

निवृत्तीच्या पोस्टमध्ये रहाणेने "भारतीय संघाची कॅप क्रमांक २७८ परिधान करण्याचा मान आयुष्यभर जपेन. मिळालेल्या प्रेम आणि पाठिंब्यासाठी मी कायम ऋणी राहीन," अशा शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या.

२०११ मध्ये झाली आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची सुरुवात-
३१ ऑगस्ट २०११ रोजी इंग्लंडविरुद्धच्या टी-२० सामन्यातून रहाणेने भारतीय संघात पदार्पण केले. त्यानंतर कसोटी क्रिकेटमध्ये त्याने आपल्या संयमी आणि तांत्रिक फलंदाजीच्या जोरावर वेगळी ओळख निर्माण केली. जुलै २०२३ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध खेळलेली कसोटी ही त्याची अखेरची आंतरराष्ट्रीय लढत ठरली.

आकडेवारीत दमदार कारकीर्द-
रहाणेने भारतासाठी ८५ कसोटी, ९० एकदिवसीय आणि २० टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले. कसोटीत त्याच्या नावावर ५,०७७ धावा, १२ शतके आणि २६ अर्धशतके आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याने २,९६२ धावा करत ३ शतके आणि २४ अर्धशतके झळकावली. तर टी-२० क्रिकेटमध्ये त्याने ३७५ धावांचे योगदान दिले.

नेतृत्वातही यशस्वी-
रहाणेने भारतीय कसोटी संघाचे ६ सामन्यांत नेतृत्व केले. त्यापैकी ४ सामन्यांत भारताने विजय मिळवला, तर दोन सामने अनिर्णित राहिले. त्याच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियात मिळालेला ऐतिहासिक कसोटी मालिका विजय भारतीय क्रिकेटच्या सुवर्णक्षणांपैकी एक मानला जातो.

शांत स्वभावाचा लढवय्या-
गाजावाजा न करता सातत्याने संघासाठी योगदान देणारा खेळाडू म्हणून अजिंक्य रहाणेची ओळख राहिली. परदेशातील कठीण खेळपट्ट्यांवर त्याने अनेक संस्मरणीय खेळी साकारल्या. त्याच्या निवृत्तीमुळे भारतीय क्रिकेटमधील विश्वासार्ह आणि संयमी फलंदाजाच्या आंतरराष्ट्रीय प्रवासाचा शेवट झाला आहे.