
Image Source:(Internet)
नागपूर : क्रिकेट क्षेत्रात मोठे नाव कमावण्याची महत्त्वाकांक्षा बाळगणाऱ्या १७ वर्षीय महिला क्रिकेटपटूने आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना नागपुरात घडली आहे. विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या (VCA) संघ निवडीत संधी न मिळाल्याने ती मानसिक तणावात होती, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. घटनास्थळावर सापडलेल्या सुसाइड नोटमध्ये "माझी निवड झाली नाही" असा उल्लेख असल्याने या घटनेने क्रीडा क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे.
बुधवारी पहाटे सुमारे ५.३० वाजता लक्ष्मीनगर परिसरातील जैन मंदिराजवळ असलेल्या उमालक्ष्मी अपार्टमेंटमधील राहत्या घरी अदिती मोरेश्वर चौकांडे (वय १७) हिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघड झाले.
अदिती ही मूळची अकोला जिल्ह्यातील रहिवासी होती. क्रिकेटमध्ये प्रगती करण्याच्या उद्देशाने ती गेल्या दोन वर्षांपासून आईसोबत नागपुरात राहत होती. येथे ती सुर्वे क्रिकेट अकादमीत नियमित सराव करत होती. राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर खेळण्याचे तिचे स्वप्न होते. तिचा भाऊदेखील क्रिकेटपटू असल्याची माहिती आहे.
पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, अलीकडेच झालेल्या व्हीसीएच्या निवड चाचणीत तिची निवड झाली नव्हती. त्यानंतर ती निराश आणि मानसिक तणावाखाली वावरत होती. घटनास्थळी पोलिसांना सुसाइड नोट सापडली असून, त्यामध्ये "माझी निवड झाली नाही" असे नमूद करण्यात आले आहे.
घटनेची माहिती मिळताच बजाजनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला असून, या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आत्महत्येमागील नेमके कारण आणि इतर सर्व पैलूंचा पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे.