कर्जमाफीत नवी अट; आयकर भरलेल्या शेतकऱ्यांना लाभ नाही, शेकडो शेतकरी ठरणार अपात्र

    29-Jul-2026
Total Views |
Image Source:(Internet)

मुंबई : राज्य सरकारने जाहीर केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेत महत्त्वाची अट घालण्यात आली आहे. २०१९-२० ते २०२५-२६ या सहा वर्षांच्या कालावधीत एकदाही आयकर (Income Tax) भरलेला असल्यास संबंधित शेतकरी कर्जमाफीसाठी अपात्र ठरणार आहे. त्यामुळे पूरक व्यवसाय किंवा इतर उत्पन्नामुळे आयकर भरावा लागलेल्या अनेक शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार नसल्याची शक्यता आहे.

मात्र, याच कालावधीत आयकर विवरणपत्र (ITR) भरले असले तरी प्रत्यक्षात कोणताही आयकर भरलेला नसेल, अशा शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे आयकर भरण्याची ही अट अनेक शेतकऱ्यांसाठी अडचणीची ठरणार आहे.

दरम्यान, राज्य शासनाने कर्जमाफी योजनेअंतर्गत १७ लाख पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी प्रसिद्ध केली आहे. या यादीत अहिल्यानगर, बुलडाणा, जालना, यवतमाळ आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांतील सर्वाधिक शेतकऱ्यांचा समावेश आहे. तर ठाणे, पालघर, गडचिरोली आणि कोकण विभागातील पात्र शेतकऱ्यांची संख्या तुलनेने अत्यंत कमी असल्याचे दिसून आले आहे.

प्रशासनाकडून पात्रतेची पडताळणी सुरू असून, आयकराशी संबंधित अटीमुळे अनेक शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.