लोकसभेत 'पेपरफुटीविरोधी दुरुस्ती विधेयक' मंजूर; विरोधकांच्या गदारोळात कायद्याला हिरवा कंदील

    29-Jul-2026
Total Views |
Image Source:(Internet)

नवी दिल्ली : संसदेच्या पावसाळी अधिवेशनात बुधवारी लोकसभेत सार्वजनिक परीक्षा (अनुचित मार्गांचा प्रतिबंध) दुरुस्ती विधेयक, २०२६ अर्थात पेपरफुटीविरोधी दुरुस्ती विधेयक मंजूर करण्यात आले. विरोधी पक्षाच्या खासदारांनी घोषणाबाजी आणि गदारोळ करत विरोध दर्शविला असतानाच हे विधेयक संमत करण्यात आले.

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी विधेयक मंजूर झाल्याची घोषणा केली. त्यानंतर सभागृहाचे कामकाज ३० जुलै रोजी सकाळी ११ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले.

विधेयक मांडताना केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी विरोधकांच्या भूमिकेवर टीका केली. सार्वजनिक परीक्षांमधील गैरप्रकार रोखण्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या या विधेयकावर विधायक सूचना करण्याऐवजी विरोधकांनी केवळ राजकारण केल्याचा आरोप त्यांनी केला.

सभागृहातील काही विरोधी सदस्यांच्या भाषेवरही त्यांनी आक्षेप घेतला. संसदीय नियम आणि परंपरांची जाणीव असलेल्या सदस्यांनी अशा प्रकारची भाषा वापरणे अयोग्य असल्याचे ते म्हणाले.

यावेळी डॉ. जितेंद्र सिंह यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या कथित वक्तव्यावरही निशाणा साधला. देशातील तरुणांना "मूर्ख" म्हणणे अत्यंत दुर्दैवी असल्याचे सांगत, तरुण हे देशाचे भविष्य असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच विरोधी पक्षाच्या नेत्यांना संसदीय शिष्टाचाराची जाणीव आहे का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

हे दुरुस्ती विधेयक सार्वजनिक परीक्षांमधील पेपरफुटी, फसवणूक आणि इतर गैरप्रकारांवर अधिक कठोर कारवाई करण्यासाठी तयार करण्यात आले आहे. विरोधकांच्या तीव्र गदारोळानंतरही अखेर हे विधेयक लोकसभेत मंजूर करण्यात आले.