CJP आंदोलनानंतर सरकारचा यू-टर्न; विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घेण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

    28-Jul-2026
Total Views |
Image Source:(Internet)

मुंबई : सीजेपीच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनानंतर राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आंदोलनादरम्यान विद्यार्थी आणि युवकांवर नोंदविण्यात आलेले गुन्हे मागे घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य पोलिसांना दिले आहेत. या निर्णयामुळे आंदोलनात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

नीट पेपरफुटीच्या निषेधार्थ सीजेपीने दिल्लीत आंदोलन छेडले होते. या आंदोलनाला महाराष्ट्रासह देशातील विविध राज्यांतील विद्यार्थी, युवक आणि पालकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. अनेक ठिकाणी आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले, तर काहींवर विविध कलमांअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले होते.

यानंतर सीजेपीने पत्रकार परिषद घेऊन आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्या विद्यार्थ्यांवर आणि कार्यकर्त्यांवर कारवाई होत असल्याचा आरोप केला होता. ही कारवाई तात्काळ थांबवावी, अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन उभारण्याचा इशाराही संघटनेने दिला होता.

या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने सकारात्मक भूमिका घेत विद्यार्थ्यांविरोधातील गुन्हे मागे घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित प्रकरणांमध्ये तातडीने आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश पोलिस प्रशासनाला दिल्याची माहिती समोर आली आहे.

मुंबई, पुणे, नागपूरसह राज्यातील अनेक शहरांमध्ये सीजेपीच्या समर्थनार्थ आंदोलने झाली होती. सरकारच्या या निर्णयामुळे आंदोलनात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांवरील कारवाई मागे घेण्याचा मार्ग मोकळा झाला असून, संबंधित प्रकरणे निकाली काढण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे.