नागपुरात पावसाचा वाढता धोका; संपूर्ण जिल्ह्यात २९ जुलैला शैक्षणिक संस्थांना सुट्टी

    28-Jul-2026
Total Views |
Image Source:(Internet)

नागपूर : नागपूर जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आल्याने जिल्हा प्रशासनाने खबरदारीचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा विचार करून बुधवार, २९ जुलै रोजी नागपूर शहर, नागपूर ग्रामीण, हिंगणा आणि कामठी तालुक्यातील सर्व सरकारी व खासगी अंगणवाड्या, शाळा, महाविद्यालये तसेच कोचिंग क्लासेसना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

भारतीय हवामान विभागाने २८ ते ३० जुलैदरम्यान ऑरेंज अलर्ट जारी केला असून, अतिवृष्टीमुळे काही भागांत पूरसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. मंगळवारी दुपारी २.३० वाजेपर्यंत शहरात १०८ मिमी पावसाची नोंद झाल्याने अनेक भागांत पाणी साचले आणि जनजीवन विस्कळीत झाले.

या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष कुमार आशीर्वाद यांनी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ अंतर्गत प्राप्त अधिकारांचा वापर करून सुट्टीचा आदेश जारी केला. हा निर्णय विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेऊन घेण्यात आला असून, नागरिकांनीही हवामान विभाग आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.