
Image Source:(Internet)
नागपूर: नागपुरात सुरू असलेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले असून शहरातील अनेक भाग जलमय झाले आहेत. प्रमुख रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहतुकीचा वेग मंदावला आहे, तर अनेक ठिकाणी नागरिकांना पाण्यातून मार्ग काढत प्रवास करावा लागत आहे. या पावसाचा मोठा फटका खामला परिसरातील सोमलवार स्कूल (निकालस शाखा, राणा प्रताप नगर रोड) येथील विद्यार्थ्यांनाही बसला आहे.
शाळेजवळ सुरू असलेले रस्त्याचे काम अद्याप पूर्ण झाले नसल्याने पावसाचे पाणी आणि चिखल थेट शाळेच्या आवारात साचला आहे. परिणामी, मैदानासह परिसरात अनेक ठिकाणी गुडघाभर पाणी साचले असून विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.
उन्हाळ्याच्या सुट्टीत पूर्ण होणे अपेक्षित असलेले रस्त्याचे काम रखडल्यामुळे मुसळधार पावसात रस्त्यावरील माती आणि चिखल शाळेच्या परिसरात वाहून आला. त्यामुळे विद्यार्थ्यांची ये-जा धोकादायक बनली असून शाळेच्या आवारात साचलेल्या पाण्यातून मार्ग काढावा लागत आहे.
शाळेच्या परिसरात पाणी साचल्याने विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी दोरीचा आधार घ्यावा लागला. या घटनेमुळे पालकांमध्ये चिंता वाढली असून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.
दरम्यान, साचलेल्या पाण्यामुळे संसर्गजन्य आजारांचा धोका वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसेच शाळेतील क्रीडा उपक्रम आणि दैनंदिन शैक्षणिक कामकाजावरही त्याचा परिणाम झाला आहे.
नागपूरातील विविध भागांमध्ये रस्ते पाण्याखाली गेल्याने वाहतूक विस्कळीत झाली असून नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी प्रशासनाकडे तातडीने पाणी उपसण्याची व्यवस्था करावी, रखडलेली विकासकामे पूर्ण करावीत आणि शाळेसह सार्वजनिक ठिकाणी सुरक्षित वातावरण निर्माण करावे, अशी मागणी केली आहे.