
Image Source:(Internet)
नागपूर: नागपूरच्या एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अमर नगर परिसरात मंगळवारी सकाळी घडलेल्या एका धक्कादायक घटनेने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. जुन्या मनस्तापातून माजी भाडेकरूने घरमालकाच्या निवासस्थानी घुसून तलवार आणि चाकूच्या साहाय्याने हल्ला केला. या घटनेत पाहुण्या म्हणून आलेल्या एका महिलेचा मृत्यू झाला, तर घरमालक आणि त्यांच्या पत्नीवर गंभीर उपचार सुरू आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोशन नीलकंठ तराळ हा काही महिन्यांपूर्वी धर्मपाल सुदाम डहाट यांच्या घरी भाड्याने राहत होता. त्या काळात मोठ्या आवाजात रेडिओ वाजवण्यासह काही कारणांवरून दोघांमध्ये वारंवार वाद होत असल्याचे समोर आले आहे. याच वादातून आरोपीने सूडाच्या भावनेतून हा हल्ला केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
मंगळवारी सकाळी सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास आरोपी शस्त्रे घेऊन डहाट यांच्या घरी पोहोचला. त्याने सर्वप्रथम धर्मपाल डहाट यांच्यावर तलवारीने हल्ला केला. स्वतःचा बचाव करताना त्यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली. त्यानंतर आरोपीने वनिता डहाट यांच्यावरही चाकूने वार केले.
दरम्यान, घरात पाहुण्या म्हणून आलेल्या ४० वर्षीय संगीता राजू चौधरी या बाहेर येताच आरोपीने त्यांच्यावरही तलवारीने प्राणघातक वार केला. गळ्यावर गंभीर जखम झाल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या वादाशी त्यांचा कोणताही संबंध नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून पसार न होता घरातच शांतपणे बसून राहिला. स्थानिक नागरिकांनी प्रसंगावधान राखत त्याला घरातच अडवून ठेवले. माहिती मिळताच एमआयडीसी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आरोपीला ताब्यात घेतले.
या प्रकरणी आरोपीविरुद्ध खुनासह इतर संबंधित कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, हल्ल्यामागील नेमके कारण आणि इतर बाबींचा पोलीस अधिक तपास करत आहेत.