
Image Source:(Internet)
नागपूर : नागपुरातील कपिलनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका २५ वर्षीय तरुणीच्या घरात घुसून तिचा बाथरूमपर्यंत पाठलाग करत अश्लील कृत्य केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विरोध केल्यानंतर आरोपीने चाकूचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून मुख्य आरोपी अद्याप फरार आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी ही आपल्या घराजवळ किराणा दुकान चालवते. घटनेच्या वेळी ती घरातील बाथरूममध्ये असताना मुख्य आरोपी आरिफ अली हा विनापरवानगी घरात शिरला. त्याने बाथरूमच्या दरवाजापर्यंत जाऊन तरुणीशी अश्लील वर्तन केले. तरुणीने विरोध करताच आरोपीने चाकू दाखवत जीवे मारण्याची धमकी दिली.
तरुणीच्या आरडाओरड्यानंतर परिसरातील नागरिक घटनास्थळी धावून आले. त्याचवेळी आरोपीचा साथीदार प्रमोद मेश्राम घटनास्थळी पोहोचला. त्याने घराबाहेर उभे राहून शिवीगाळ केली तसेच पोलिसांत तक्रार केल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी दिली. त्यानंतर दोन्ही आरोपी तेथून पसार झाले.
पीडितेच्या तक्रारीवरून कपिलनगर पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. तपासादरम्यान पोलिसांनी प्रमोद मेश्राम याला अटक केली असून मुख्य आरोपी आरिफ अली याचा शोध सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांकडून आरोपीला लवकरच अटक करण्यात येईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.