नाशिकमध्ये भूगर्भीय हालचालींची चिंता वाढली; सुरगाण्यात जमिनीला तडे, इगतपुरीत डोंगराचा भाग खचला

    28-Jul-2026
Total Views |
Image Source:(Internet)

नाशिक : नाशिक जिल्ह्यातील काही भागांमध्ये भूगर्भीय हालचालींची चिन्हे दिसून येत असून प्रशासन सतर्क झाले आहे. सुरगाणा तालुक्यात सलग तिसऱ्या दिवशी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवत असताना, अनेक ठिकाणी शेतजमिनींना भेगा पडल्याचे समोर आले आहे. दुसरीकडे इगतपुरी तालुक्यात डोंगराचा मोठा भाग खचल्याने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे.

सुरगाणा, पेठ आणि दिंडोरी तालुक्यांमध्ये मागील काही दिवसांपासून भूगर्भातील हालचाली जाणवत आहेत. सुरगाणा तालुक्यातील बोरगाव परिसरात सोमवारी रात्री पुन्हा सौम्य धक्के जाणवले. या भागातील काही शेतजमिनींमध्ये तडे गेले असून पावसाचे पाणी या भेगांमध्ये साचल्याने जमीन आणखी खचण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

तहसीलदार रामजी राठोड यांनी या परिस्थितीची माहिती जिल्हाधिकारी आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाला दिली आहे. जमिनीला पडलेल्या भेगा आणि तड्यांचा संभाव्य धोका लक्षात घेता भूवैज्ञानिक तज्ज्ञांकडून परिसराची तपासणी करण्याची गरज असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

सुरगाणा तालुक्यातील सराड येथील मुलींच्या वसतिगृहाच्या भिंतींना तडे गेल्याचे आढळून आले आहे. चिखली परिसरात जमिनीला मोठ्या चिरा पडल्या असून माळेगाव येथे सुमारे ३५ ते ४० मीटर परिसरातील जमीन खचल्याचे किंवा हालचाल झाल्याचे निरीक्षण करण्यात आले आहे. तसेच राशा येथील काही शेतांमध्येही जमिनीला भेगा पडल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, इगतपुरी तालुक्यातील आंबेवाडी येथे सह्याद्रीच्या डोंगररांगांमधील मोठा भाग खचला. डोंगरातून पाण्याचा जोरदार प्रवाह खाली आल्याने त्यासोबत दगड, गोटे, माती आणि मुरूम वाहून आले. या प्रवाहामुळे वनपट्टेधारक आणि खासगी शेतकऱ्यांच्या जमिनीचे मोठे नुकसान झाले असून शेती अक्षरशः खरवडून निघाली आहे.

या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी प्रशासनाकडून ड्रोनच्या माध्यमातून सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. आदिवासी भागातील शेतजमिनी पूर्ववत करण्यासाठी नुकसानाचा अंदाज तयार केला जात असून, पाण्याचा योग्य वापर करण्यासाठी कटवेअर बंधारा आणि इतर उपाययोजनांचे प्रस्ताव तयार करण्यात येत आहेत.

भूकंपाचे धक्के जाणवणारा सुरगाणा परिसर आणि डोंगर खचण्याची घटना घडलेला इगतपुरी भाग यांचा थेट संबंध नसला, तरी दोन्ही ठिकाणी भूगर्भीय बदल आणि अतिवृष्टीचा परिणाम दिसून येत आहे. मुसळधार पावसाच्या पट्ट्यात येणाऱ्या या भागांमध्ये प्रशासनाने परिस्थितीवर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली आहे.