
Image Source:(Internet)
नागपूर : हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मानेवाडा स्मशानभूमी परिसरात शनिवारी दुपारी जुन्या वैमनस्यातून झालेल्या प्राणघातक हल्ल्यात एका तरुणाचा मृत्यू झाला, तर त्याचा साथीदार गंभीर जखमी झाला. दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.
मृताची ओळख पवन सूर्यवंशी अशी असून अमन काळे याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
प्राथमिक माहितीनुसार, तीन महिन्यांपूर्वी झालेल्या एका चाकूहल्ल्याच्या घटनेतून निर्माण झालेल्या वैराची ही परिणती असल्याचा संशय आहे. समाजमाध्यमांद्वारे संपर्क साधून पवनला चर्चा करण्यासाठी मानेवाडा स्मशानभूमी परिसरात बोलावण्यात आले होते.
पवन सूर्यवंशी, अमन काळे आणि अजय सोलंकी घटनास्थळी पोहोचताच तेथे आधीपासून थांबलेल्या ८ ते १० जणांनी त्यांना घेरले. सुरुवातीला शाब्दिक वाद झाला. त्यानंतर अचानक आरोपींनी धारदार शस्त्रे बाहेर काढून पवनवर सपासप वार केले. मध्ये पडलेल्या अमनवरही हल्ला करण्यात आला.
रक्ताच्या थारोळ्यातून जीव वाचविण्यासाठी दोघांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, गंभीर जखमी झालेला पवन काही अंतरावर कोसळला. हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाले. पोलिसांनी दोघांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच पवनचा मृत्यू झाला.
घटनेनंतर पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाची माहिती घेतली. या प्रकरणात काका उर्फ अमन चौरसिया, यश सरोदे, वेदांत कापटे, रौनक राऊत, पियुष बघेल, नायडू यांच्यासह अन्य संशयितांचा शोध सुरू असून, हुडकेश्वर पोलीस पुढील तपास करीत आहेत.