
Image Source:(Internet)
नागपूर : नागपूर जिल्ह्यातील सावनेर परिसरात राष्ट्रीय महामार्गावर शुक्रवारी रात्री भीषण अपघात झाला. भरधाव वेगाने चुकीच्या दिशेने आलेल्या वाहनाने ट्रकला समोरून जोरदार धडक दिल्याने ट्रकवरील २३ वर्षीय क्लिनरचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून सावनेर पोलिसांनी संबंधित वाहनचालकाला ताब्यात घेतले आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, मध्य प्रदेशातील मुलताई येथील रहिवासी रोशन पवार (वय २३) हा सीजी पीएक्स १८१६ क्रमांकाच्या ट्रकवर क्लिनर म्हणून काम करत होता. शुक्रवारी रात्री सुमारे १०.१५ वाजण्याच्या सुमारास हा ट्रक मुलताईहून नागपूरच्या दिशेने येत असताना आरजे ४२ जीबी ३३१४ क्रमांकाचे वाहन चुकीच्या मार्गाने वेगात येऊन ट्रकवर आदळले.
धडक इतकी तीव्र होती की, रोशन पवार ट्रकमधून बाहेर फेकला गेला. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याची प्रकृती अत्यंत चिंताजनक झाली.
घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस, सावनेर पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारी ऋतुजा जाधव, पोलीस उपनिरीक्षक उमेश मेश्राम, महामार्ग पोलीस कर्मचारी दीपक पांचपोर व प्रदीप वाघ, तसेच हितज्योती आधार फाउंडेशनचे स्वयंसेवक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जखमी रोशनला तातडीने सावनेर येथील शासकीय रुग्णालयात हलविले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले.
या अपघाताप्रकरणी सावनेर पोलिसांनी संबंधित वाहनचालकाला ताब्यात घेतले असून त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे. अपघातामागील नेमके कारण आणि इतर बाबींचा सखोल तपास पोलीस करीत आहेत.