धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; 'युवाशक्तीचा विजय' म्हणत दिला राजकीय संदेश

    25-Jul-2026
Total Views |
Image Source:(Internet)

नवी दिल्ली : केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर देशाच्या राजकारणात नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे. NEET पेपरफुटी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर गेल्या अनेक दिवसांपासून विरोधकांकडून त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत होती. अखेर प्रधान यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) अध्यक्ष शरद पवार यांनी पहिली प्रतिक्रिया देत या घडामोडीला "युवाशक्तीचा विजय" असे संबोधले.

शरद पवार यांनी म्हटले की, NEET पेपरफुटी प्रकरणाविरोधात दिल्लीतील जंतर-मंतर येथे तब्बल २८ दिवस विद्यार्थ्यांनी आणि तरुणांनी दिलेला संघर्ष लोकशाहीवरील विश्वास अधिक दृढ करणारा ठरला आहे. आंदोलकांच्या सातत्यपूर्ण लढ्यामुळे सरकारला नैतिक जबाबदारी स्वीकारावी लागली, असे त्यांनी नमूद केले.

पवार यांनी पुढे सांगितले की, अन्यायाविरोधात न डगमगता उभे राहिलेल्या तरुणांच्या संघर्षाने लोकशाहीची ताकद पुन्हा अधोरेखित केली आहे. तसेच, या आंदोलनाला संसदीय आणि नैतिक पाठबळ देणाऱ्या विरोधी पक्षातील सर्व खासदारांचे त्यांनी आभार मानले.

देशातील युवकांच्या एकजुटीमुळे हा लढा यशस्वी ठरल्याचे सांगताना पवार यांनी "देशातील लोकशाही नव्या टप्प्यात प्रवेश करत आहे," असा सूचक राजकीय संदेशही दिला.

दरम्यान, धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर केंद्रातील राजकीय घडामोडींना वेग आला असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीला जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत केंद्र आणि राज्याच्या राजकारणात कोणते नवे निर्णय होतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.