शेतकऱ्यांसाठी चांगल्या पावसाची प्रार्थना; धाराशिवच्या माने दांपत्याला 'मानाच्या वारकऱ्यांचा' बहुमान

Image Source:(Internet)
पंढरपूर : आषाढी एकादशीच्या पावन पर्वावर पंढरपूरातील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात शनिवारी पहाटे अडीच वाजता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते शासकीय महापूजा भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी विठुरायाच्या चरणी नतमस्तक होत राज्यातील शेतकऱ्यांना सुखाचे दिवस यावेत, सर्वत्र समाधानकारक पाऊस पडावा आणि महाराष्ट्र सुजलाम्-सुफलाम् व्हावा, अशी मनोभावे प्रार्थना केली.
यंदाही परंपरेप्रमाणे दर्शन रांगेतील एका निष्ठावंत वारकरी दांपत्याला मुख्यमंत्र्यांसोबत महापूजा करण्याचा मान मिळाला. धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील गौरगाव येथील शेतकरी बाळासाहेब माधव माने आणि त्यांच्या पत्नी प्रभावती बाळासाहेब माने यांची 'मानाचे वारकरी' म्हणून निवड करण्यात आली.
७० वर्षीय बाळासाहेब माने हे गेली २० वर्षे आळंदी ते पंढरपूर अशी पायी वारी करत आहेत. यंदा त्यांनी आपल्या पत्नीसोबत वारी केली. मध्यरात्री १२ वाजता दर्शन रांग बंद झाली तेव्हा ते रांगेत सर्वप्रथम असल्याने निवड समितीने त्यांची 'मानाचे वारकरी' म्हणून निवड केली.
मुख्यमंत्र्यांसमवेत विठ्ठल-रुक्मिणीची महापूजा करण्याचा सन्मान मिळाल्याने माने दांपत्याने भावूक होत आनंद व्यक्त केला. विठुरायाच्या चरणी पूजा करण्याची संधी आयुष्यातील अविस्मरणीय क्षण असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूर नगरीत लाखो वारकऱ्यांच्या "ज्ञानोबा-तुकाराम" आणि "पुंडलिक वरदा हरी विठ्ठल" या जयघोषाने भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून संपूर्ण पंढरपूर विठ्ठलनामाच्या गजराने दुमदुमून गेले आहे.