
Image Source:(Internet)
नागपूर : विदर्भातील संत्रा उत्पादनाला नवसंजीवनी देण्यासाठी रोगमुक्त आणि दर्जेदार रोपांची निर्मिती ही अत्यंत महत्त्वाची असल्याचे केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले. शास्त्राधारित शेती, संशोधनाचा प्रत्यक्ष शेतकऱ्यांना लाभ आणि आधुनिक रोपनिर्मिती यामुळे संत्रा विदर्भाच्या कृषी अर्थव्यवस्थेचा कणा बनू शकतो, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
भारतीय कृषी संशोधन परिषद (आयसीएआर) अंतर्गत केंद्रीय लिंबूवर्गीय फळ संशोधन संस्थानात 'क्लीन प्लांट' (रोगमुक्त रोपे) उपक्रमाअंतर्गत आयोजित कार्यशाळेत ते बोलत होते. या कार्यक्रमाला संस्थेचे संचालक दिलीप कुमार घोष, मुख्य शास्त्रज्ञ डॉ. ए. के. दास, सुधीर दिवे तसेच देशातील १२ राज्यांतील कृषी अधिकारी, संशोधक आणि अभ्यासक उपस्थित होते.
गडकरी म्हणाले, विदर्भातील शेतीसमोरील आव्हानांवर मात करण्यासाठी केवळ पाणी व्यवस्थापन आणि मृदा परीक्षण पुरेसे नाही, तर रोगमुक्त आणि उच्च दर्जाची रोपे उपलब्ध होणेही तितकेच आवश्यक आहे. संशोधन संस्थांनी स्थानिक गरजांनुसार तंत्रज्ञान विकसित करून ते शेतकऱ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवावे.
त्यांनी पुढे सांगितले की, सरकारी संस्थांनी दर्जेदार रोपे आणि बियाण्यांची निर्मिती करण्याबरोबरच रोपवाटिका चालक व शेतकऱ्यांना आधुनिक रोपनिर्मितीचे प्रशिक्षण द्यावे. त्यामुळे कमी खर्चात अधिक उत्पादन मिळून संत्रा उत्पादकांचे उत्पन्न वाढण्यास मोठी मदत होईल.
यावेळी महाराष्ट्रातील रोपवाटिकांसंदर्भातील कायद्यात करण्यात आलेल्या सुधारणांचा उल्लेखही करण्यात आला. या बदलांमुळे दर्जेदार रोपनिर्मितीला चालना मिळून विदर्भातील संत्रा उद्योग अधिक बळकट होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.