सोशल मीडियावर अफवा पसरवण्याचा प्रयत्न; कोतवाली पोलिसांची कारवाई

Image Source:(Internet)
नागपूर : नागपूर येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) मुख्यालयाला हजारो विद्यार्थ्यांनी घेराव घातल्याचा दावा करणारी सोशल मीडियावरील पोस्ट खोटी असल्याचे उघड झाल्यानंतर कोतवाली पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दिशाभूल करणारी माहिती प्रसारित करून कायदा व सुव्यवस्थेला बाधा पोहोचवण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, २४ जुलै रोजी सकाळी सुमारे ११.३० वाजता कोतवाली पोलीस ठाण्याच्या गुप्तवार्ता शाखेतील पोलीस हवालदार अनिल रामाजी बोद्रे यांनी @vizhpuneet या 'एक्स' खात्यावर "Thousands of students surrounded the RSS headquarters in Nagpur" असा मजकूर असलेली पोस्ट पाहिली.
त्यानंतर पोलिसांनी तातडीने या पोस्टची शहानिशा केली. तपासात नागपूरच्या RSS मुख्यालयाबाहेर अशा प्रकारची कोणतीही घटना घडली नसल्याचे स्पष्ट झाले. संबंधित पोस्टमध्ये करण्यात आलेला दावा पूर्णपणे निराधार आणि वस्तुस्थितीविरोधी असल्याचे निष्पन्न झाले.
पोलिसांनी नमूद केले की, RSS मुख्यालय हे अतिसंवेदनशील ठिकाण असल्याने अशा प्रकारच्या खोट्या पोस्टमुळे नागरिकांमध्ये भीती, संभ्रम आणि तणाव निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे सार्वजनिक शांतता आणि कायदा-सुव्यवस्थेवर विपरीत परिणाम होऊ शकतो.
या प्रकरणी कोतवाली पोलिसांनी संबंधित 'एक्स' खात्याच्या वापरकर्त्याविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम 353(2) अंतर्गत गुन्हा नोंदवला असून पुढील तपास सुरू आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत जुमळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल कातकाडे या प्रकरणाचा तपास करत आहेत.