धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा; नागपूरच्या संविधान चौकात विद्यार्थ्यांचा जल्लोष

    25-Jul-2026
Total Views |
Image Source:(Internet)

नागपूर : केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी पदाचा राजीनामा दिल्याची घोषणा होताच नागपूरातील संविधान चौकात जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले. कॉकरोच जनता पार्टी (CJP)चे कार्यकर्ते, विद्यार्थी आणि युवक मोठ्या संख्येने एकत्र आले. ढोल-ताशांच्या गजरात नृत्य करत, घोषणा देत आणि एकमेकांना मिठाई भरवत त्यांनी हा क्षण साजरा केला.

NEET परीक्षा अनियमिततेविरोधात आणि शिक्षण व्यवस्थेतील पारदर्शकतेच्या मागणीसाठी देशभर सुरू असलेल्या आंदोलनात नागपूरातील विद्यार्थ्यांनीही सक्रिय सहभाग घेतला होता. शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची बातमी समोर येताच संविधान चौकात उत्स्फूर्त गर्दी झाली.

हातात फलक, तिरंगा आणि घोषणाबाजी करत विद्यार्थ्यांनी "विद्यार्थी एकजूट जिंदाबाद", "हा संघर्ष न्यायासाठी होता" अशा घोषणा दिल्या. अनेक विद्यार्थ्यांनी ढोल-ताशांच्या तालावर ठेका धरत आनंद व्यक्त केला.

CJPच्या पदाधिकाऱ्यांनी हा विजय विद्यार्थ्यांच्या चिकाटीचा आणि लोकशाही मार्गाने दिलेल्या लढ्याचा परिणाम असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांच्या एकजुटीपुढे सरकारला निर्णय घ्यावा लागला, असा दावा त्यांनी केला.

संविधान चौकातील हा जल्लोष बराच वेळ सुरू होता. ढोल-ताशांचा गजर, घोषणाबाजी आणि विद्यार्थ्यांचा उत्साह यामुळे परिसरात उत्सवी वातावरण निर्माण झाले.