
Image Source:(Internet)
नवी दिल्ली- NEET पेपर लीक प्रकरणावरून दिल्लीतील जंतर-मंतरवर सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनात बुधवारी मोठी राजकीय घडामोड घडली. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आंदोलनस्थळी भेट देत विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष पाठिंबा जाहीर केला. यावेळी त्यांनी आंदोलनकर्त्यांशी संवाद साधत पोलिसांच्या कारवाईवर तीव्र नाराजी व्यक्त केली आणि केंद्र सरकारवर जोरदार टीका केली.
'CJP'च्या माध्यमातून अभिजित दीपके यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनाला भेट दिल्यानंतर ठाकरे म्हणाले, "देशाच्या भवितव्यासाठी लढणाऱ्या विद्यार्थ्यांना भेटण्यासाठी आलो आहे. त्यांच्या आवाजाला बळ देणे ही आपली जबाबदारी आहे."
पोलिस कारवाईवर संताप; सरकारवर कठोर शब्दांत निशाणा-
आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जचा उल्लेख करत उद्धव ठाकरे यांनी सरकारवर हल्लाबोल केला. "देशाचं भविष्य घडवणाऱ्या तरुणांवरच बळाचा वापर केला जात असेल, तर ही अत्यंत गंभीर बाब आहे. विद्यार्थ्यांशी अशी वागणूक देणारे राज्यकर्ते नेमके कोणासाठी काम करत आहेत?" असा सवाल त्यांनी उपस्थित केला. याचवेळी त्यांनी "हे राज्यकर्ते पाकिस्तानमधून आलेत का?" अशी संतप्त प्रतिक्रियाही व्यक्त केली.
फक्त मंत्री बदलून उपयोग नाही-
केंद्र सरकारवर निशाणा साधताना ठाकरे म्हणाले, "एखाद्या मंत्र्याचा राजीनामा घेऊन हा विषय संपणार नाही. तरुणांचा विश्वास गमावलेल्या व्यवस्थेला उत्तर द्यावेच लागेल." त्यांनी सरकारने विद्यार्थ्यांच्या मागण्यांबाबत संवेदनशील भूमिका घ्यावी, अशी मागणीही केली.
अभिजित दीपके यांच्या नेतृत्वाचे कौतुक-
राष्ट्रीय स्तरावरील या आंदोलनाचे नेतृत्व महाराष्ट्रातील अभिजित दीपके करत असल्याचा अभिमान व्यक्त करत ठाकरे म्हणाले, "हा संघर्ष केवळ काही विद्यार्थ्यांचा नाही, तर देशातील लाखो युवकांच्या भविष्याचा आहे. महाराष्ट्र या लढ्यात विद्यार्थ्यांच्या पाठीशी ठाम उभा आहे."
लढा सुरू ठेवा, न्याय मिळाल्याशिवाय माघार घेऊ नका-
विद्यार्थ्यांना संबोधित करताना त्यांनी आंदोलन कायम ठेवण्याचे आवाहन केले. "न्याय मिळेपर्यंत हा लढा थांबवू नका. तुमच्यावर झालेला अन्याय देशासमोर आणा," असे ते म्हणाले.
दरम्यान, आंदोलनाचे नेतृत्व करणारे अभिजित दीपके यांनी उद्धव ठाकरे यांचे आभार मानत सांगितले की, "पोलिसांच्या कारवाईनंतर अनेक विद्यार्थी निराश झाले होते. मात्र, उद्धव ठाकरे यांनी आंदोलनस्थळी येऊन दिलेल्या पाठिंब्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नव्याने आत्मविश्वास निर्माण झाला आहे."
दिल्लीतील या आंदोलनाला विरोधी पक्षांचा वाढता पाठिंबा मिळत असताना, विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर केंद्र सरकार कोणती भूमिका घेणार, याकडे आता देशभराचे लक्ष लागले आहे.