आंदोलनात आलात तर ड्रग्जच्या गुन्ह्यात अडकवू? मुंबई पोलिसांची विद्यार्थांना धमकी, काँग्रेसचा आरोप

    23-Jul-2026
Total Views |
Image Source:(Internet)

मुंबई : नीट पेपरफुटीविरोधातील देशव्यापी आंदोलनादरम्यान मुंबई पोलिसांवर काँग्रेसने गंभीर आरोप केले आहेत. आंदोलनात सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना ड्रग्जच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देण्यात आल्याचा दावा काँग्रेसने केला आहे. यासंदर्भातील एक कथित व्हिडिओ पक्षाने समोर आणला असून, त्याची चौकशी करण्याची मागणीही केली आहे.

काँग्रेसच्या म्हणण्यानुसार, ताब्यात घेतलेल्या विद्यार्थ्यांशी बोलताना एका पोलीस कर्मचाऱ्याने पुन्हा आंदोलनात सहभागी झाल्यास त्यांच्या जवळ ५० ग्रॅम ड्रग्जची पावडर टाकून गुन्हा दाखल करू, अशी धमकी दिली. त्यानंतर जामीन मिळणार नाही आणि संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होईल, असेही त्या कर्मचाऱ्याने सांगितल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र, हा व्हिडिओ नेमका कुठला आणि कधीचा आहे, याबाबत अधिकृत माहिती उपलब्ध नाही.

काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी या कथित घटनेची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली आहे. विद्यार्थ्यांना आंदोलनापासून परावृत्त करण्यासाठी ड्रग्ज प्रकरणाची भीती दाखवली जात असेल, तर तो लोकशाहीसाठी अत्यंत चिंताजनक प्रकार असल्याचे त्यांनी म्हटले.

दरम्यान, नीट पेपरफुटीविरोधातील आंदोलनाला अनेक विरोधी पक्षांचा पाठिंबा मिळत असून, सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनीही आंदोलकांवर कठोर कारवाई न करण्याचे आवाहन केंद्र सरकारला केले आहे.