अजित पवारांचा मृत्यू अपघात नव्हे, घातपात असू शकतो;रत्नागिरीत भास्कर जाधवांचा दावा

    23-Jul-2026
Total Views |
Image Source:(Internet)

रत्नागिरी : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते भास्कर जाधव यांनी दिवंगत अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेबाबत गंभीर शंका व्यक्त करत या प्रकरणाची सखोल आणि निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली. ही घटना केवळ अपघात म्हणून पाहता येणार नाही, असा संशय अनेकांच्या मनात असल्याचे त्यांनी सांगितले.

भास्कर जाधव म्हणाले की, अजितदादा पवार हे अत्यंत नेमस्त, सर्वसमावेशक आणि लोकाभिमुख नेतृत्व होते. त्यांनी कधीही पक्षीय राजकारण न करता सर्वसामान्यांच्या कामांना प्राधान्य दिले. बारामतीतील असो किंवा इतर कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता असो, अजितदादांनी सर्वांची कामे प्रामाणिकपणे केली. त्यांच्या सहवासात प्रशासन, लोकसंपर्क आणि निर्णयक्षमतेचे अनेक धडे शिकायला मिळाल्याचेही त्यांनी नमूद केले.

यावेळी त्यांनी सोशल मीडियावरील त्यांच्या व्हॉट्सॲप स्टेटसबाबतही भूमिका स्पष्ट केली. सार्वजनिक जीवनात आणि राजकारणात नीतिमत्तेचे अधःपतन होता कामा नये, असे ते म्हणाले.

नीट पेपरफुटी प्रकरणावर बोलताना भास्कर जाधव यांनी, "पेपरफुटी करणारे जितके दोषी आहेत, तितकेच पैसे देऊन प्रश्नपत्रिका विकत घेणारेही दोषी आहेत. अशा दोन्ही घटकांवर कठोर कारवाई झाली पाहिजे," असे मत व्यक्त केले.

दरम्यान, अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेबाबत त्यांनी पुन्हा एकदा संशय व्यक्त करत, "या दुर्घटनेच्या तपासाची दिशा आणि गती पाहता घातपाताचा संशय निर्माण होत आहे. या प्रकरणाचा सखोल, निष्पक्ष आणि पारदर्शक तपास करून सत्य जनतेसमोर आणावे," अशी मागणी केली.