सीताबर्डीत 'अन्ना गँग'चा पुन्हा कहर! अवघ्या ५ मिनिटांत दोन कार फोडून लॅपटॉपसह मौल्यवान ऐवज लंपास

    23-Jul-2026
Total Views |
Image Source:(Internet)

नागपूर : शहरात पुन्हा एकदा 'अन्ना गँग'ने डोके वर काढले असून, सीताबर्डी परिसरात अवघ्या पाच मिनिटांच्या अंतराने दोन कारचे काच फोडून लॅपटॉप आणि महत्त्वाचे साहित्य चोरी करण्यात आले. या दोन्ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्या असून, एकाच पद्धतीने चोरी केल्यामुळे या प्रकारामागे 'अन्ना गँग'चा हात असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

पहिली घटना धीरन कन्या महाविद्यालयासमोर घडली. दिघोरीतील आराधना नगर येथील रहिवासी भूषण दुधे हे व्यावसायिक बैठकीसाठी आले होते. त्यांनी कार पार्क केल्यानंतर अज्ञात चोरट्यांनी कारची काच फोडून लॅपटॉप बॅग चोरून नेली. या बॅगमध्ये सुमारे ८० हजार रुपयांची रोकड, मुलीचे जात प्रमाणपत्र, बँकेचे पासबुक आणि इतर महत्त्वाची कागदपत्रे होती.

पहिल्या घटनेनंतर अवघ्या पाच मिनिटांतच वैरायटी चौकातील बाटा शोरूमसमोर उभी असलेली स्विफ्ट कारही चोरट्यांनी फोडली. मनीष नगर येथील जयंती नगरीतील रहिवासी आणि खासगी कंपनीतील व्यवस्थापक विपिन शर्मा यांच्या कारमधील लॅपटॉप बॅग आरोपींनी लंपास केली.

दोन्ही घटनांचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या ताब्यात आले आहे. त्यामध्ये संशयित आरोपी कारजवळ घुटमळत असल्याचे आणि संधी साधून काच फोडून चोरी करत असल्याचे स्पष्ट दिसत आहे.

यापूर्वीही शहरातील विविध भागांत अशाच प्रकारच्या कारफोडीच्या घटना घडल्या असून, त्यामागे 'अन्ना गँग'चाच हात असल्याची चर्चा आहे. सीसीटीव्हीचे पुरावे असूनही आरोपी अद्याप पोलिसांच्या हाती लागत नसल्याने या टोळीचा बंदोबस्त करणे नागपूर पोलिसांसाठी मोठे आव्हान बनले आहे. पोलिसांकडून सीसीटीव्हीच्या आधारे आरोपींचा शोध सुरू आहे.