
Image Source:(Internet)
नवी दिल्ली : संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू असताना आणि दिल्लीतील जंतर-मंतरवर नीट (NEET) पेपर लीक प्रकरणी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू असतानाच राजधानीत महत्त्वाची राजकीय घडामोड घडली. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी संसद भवनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे.
मंगळवारी शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी जंतर-मंतर येथे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांची भेट घेतली होती. पोलिसांच्या कारवाईत जखमी झालेल्या विद्यार्थ्यांची विचारपूस करून त्यांच्या मागण्या जाणून घेतल्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतल्याने या भेटीकडे विशेष लक्ष वेधले गेले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, विद्यार्थ्यांवरील पोलिस कारवाई आणि त्यांच्या मागण्यांचा मुद्दा पंतप्रधानांसमोर मांडण्यात आला.
दरम्यान, ही भेट सुप्रिया सुळे यांच्या डिलिमिटेशन (मतदारसंघ पुनर्रचना) विषयावरील विधानानंतर झाली आहे. सुळे यांनी सरकारने सर्व राज्यांतील लोकसभा जागांमध्ये समान प्रमाणात ५० टक्के वाढ करण्याचा प्रस्ताव आणल्यास राष्ट्रवादी काँग्रेस (एसपी) त्याला सशर्त पाठिंबा देण्याचा विचार करू शकते, असे म्हटले होते. मात्र, याबाबत अंतिम निर्णय घेण्यापूर्वी 'इंडिया' आघाडीतील घटक पक्षांशी चर्चा केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले होते.
एकीकडे विरोधी पक्ष नीट पेपर लीक प्रकरण आणि दिल्ली पोलिसांच्या कारवाईवरून केंद्र सरकारवर टीका करत असताना, दुसरीकडे शरद पवारांनी थेट पंतप्रधान मोदींची भेट घेऊन संवादाचा मार्ग स्वीकारल्याचे दिसून येत आहे.
या भेटीत नेमकी कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली, याची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. मात्र, विद्यार्थी आंदोलन, डिलिमिटेशन आणि आगामी राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झाले असून, तिच्या राजकीय परिणामांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.