राज्यातील कर्जमाफीला सुरुवात; ५५३ पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

    22-Jul-2026
Total Views |
४०,९८० कोटींच्या योजनेची अंमलबजावणी
 
Loan waiver
 Image Source:(Internet)
मुंबई : राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी शेतकरी (Farmers) कर्जमाफी योजनेच्या अंमलबजावणीला अधिकृतपणे सुरुवात झाली असून, पात्र ठरलेल्या ५५३ शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी ही माहिती देताना, या निर्णयामुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार असल्याचे सांगितले.
 
राज्य सरकारने या योजनेसाठी ३६,५८५ कोटी रुपयांची तरतूद केली असून, सुमारे ५६ लाख शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. तसेच, महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ घेतलेल्या १२ लाख शेतकऱ्यांनाही दोन लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमाफीचा लाभ देण्यात येणार आहे. यासाठी अतिरिक्त ४,३९५ कोटी रुपये खर्च करण्यात येणार असून, एकूण कर्जमाफीचा आकडा ४०,९८० कोटी रुपयांपर्यंत पोहोचणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
 
सहकार मंत्र्यांनी सांगितले की, लाभार्थी निवड, यादी प्रसिद्ध करणे आणि कर्जमाफीची संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक व नियोजनबद्ध पद्धतीने राबवली जात आहे. ही योजना केवळ कर्जमाफीपुरती मर्यादित नसून, शेतकऱ्यांना पुन्हा सक्षमपणे शेती करता यावी हा राज्य सरकारचा उद्देश आहे.
 
यापूर्वी कर्जमाफी झालेल्या अनेक शेतकऱ्यांना नव्याने कर्ज मिळण्यात अडचणी येत होत्या. मात्र, आता कर्जमाफीचा लाभ घेतल्यानंतर पात्र शेतकऱ्यांना पुन्हा कर्ज उपलब्ध करून देण्याचे निर्देश सरकारने बँकांना दिल्याचेही बाबासाहेब पाटील यांनी स्पष्ट केले.
 
पहिल्या टप्प्यातील जिल्हानिहाय लाभार्थी-
राज्य सरकारने जाहीर केलेल्या पहिल्या यादीत एकूण ५५३ शेतकऱ्यांचा समावेश असून त्यामध्ये अमरावती जिल्हा बँकेचे ५८, लातूरचे १३३, नागपूरचे १६, पुण्याचे ८५, साताऱ्याचे ३८ आणि ठाणे जिल्हा बँकेचे १८२ शेतकरी आहेत. या सर्व शेतकऱ्यांचे मिळून २ कोटी ९९ लाख ३७ हजार ५४० रुपयांचे कर्ज माफ करण्यात आले आहे. उर्वरित पात्र लाभार्थ्यांच्या याद्या टप्प्याटप्प्याने संकेतस्थळावर अपलोड करण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.

यादी जाहीर होण्यास विलंब का?
प्रारंभी ५ जुलैपर्यंत सर्व याद्या जाहीर करण्याचे नियोजन होते. मात्र, २०१९ मधील कर्जमाफी योजनेतील लाभार्थ्यांची पडताळणी आणि आयकर भरणाऱ्या शेतकऱ्यांचा डेटा तपासण्याचे काम सुरू असल्याने प्रक्रियेला काहीसा विलंब झाला आहे. शेतीव्यतिरिक्त उत्पन्नावर आयकर भरणाऱ्या व्यक्तींना या योजनेचा लाभ दिला जाणार नसल्याचे सहकार विभागाने स्पष्ट केले आहे.
 
नियमित कर्जफेड करणाऱ्यांनाही लाभ-
नियमितपणे कर्जाची परतफेड करणाऱ्या २३.६३ लाख शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येणार आहे. तर एकूण सुमारे ३२ लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी प्रत्यक्षात होणार असल्याची माहिती सरकारने दिली.
 
शेतकऱ्यांनी काय करावे?
कर्जमाफीचा लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी 'आपले सरकार सेवा केंद्र' येथे जाऊन आधार प्रमाणीकरण करणे आवश्यक आहे. त्यावेळी कर्जाची माहिती अचूक असल्याची खात्री करून घ्यावी. प्रमाणीकरण पूर्ण झाल्यानंतर पुढील प्रशासकीय प्रक्रिया राबवून कर्जमाफीचा लाभ वितरित करण्यात येणार आहे.