नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Fadnavis) यांच्या वाढदिवसानिमित्त आणि माजी उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या स्मृतिदिनानिमित्त नागपुरात विविध जनहिताच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्य सरकारच्या विविध लोककल्याणकारी योजनांचा आढावा घेत जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण करण्यासाठी शासन वचनबद्ध असल्याचे सांगितले.
बेलतरोडी येथील पाचमंदिर मैदानावर आयोजित 'छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियान' आणि महाआरोग्य शिबिरात बोलताना बावनकुळे म्हणाले की, राज्यातील प्रत्येक नागरिकाला पारदर्शक आणि विश्वासार्ह प्रशासन मिळावे, यासाठी सरकार सातत्याने प्रयत्न करत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या लोकाभिमुख राज्यकारभाराचा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानिक मूल्यांचा आदर्श समोर ठेवून शासन निर्णय घेत आहे.
राज्यातील नागरिकांच्या मालमत्तेचे संरक्षण, प्रलंबित जमीन आणि घरांच्या मालकी हक्काचे प्रश्न निकाली काढणे तसेच सर्वसामान्यांना कायदेशीर हक्क मिळवून देण्यासाठी शासनाने अनेक महत्त्वाचे निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. विविध जिल्ह्यांतील हजारो कुटुंबांना त्यांच्या जागेचे मालकी हक्क प्रदान करण्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले.
शेतकरी, महिला आणि वंचित घटकांसाठी शासनाने अनेक योजना राबवल्या असून लाडकी बहीण योजना, महिलांना शेतकरी दर्जा, पात्र अतिक्रमणधारकांना जमीनपट्टे आणि प्लॉटधारकांना कायदेशीर मान्यता यांसारखे निर्णय जनतेच्या हिताचे असल्याचे बावनकुळे म्हणाले.
या शिबिरात २२० लाभार्थ्यांना मालकी हक्काचे पट्टे, ४०० जणांना स्वामित्व हक्क प्रमाणपत्रे, तर विविध शासकीय विभागांच्या योजनांचा लाभ देण्यात आला. तसेच ९८ शेतमजूर महिलांना शेतकरी प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.
दरम्यान, इमामवाडा आयसोलेशन रुग्णालय परिसरात आयोजित 'सेवा गौरव दिन' कार्यक्रमात सफाई कर्मचाऱ्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. यावेळी बावनकुळे यांनी सफाई कर्मचाऱ्यांच्या सन्मानासह त्यांच्या कुटुंबीयांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी शासन कटिबद्ध असल्याचे सांगितले.
या कार्यक्रमात सुमारे १,२०० लाभार्थ्यांना शिलाई मशीन, ई-रिक्षा, सायकली आणि स्वयंरोजगारासाठी लागणारे विविध साहित्य वितरित करण्यात आले. शासनाच्या योजनांचा लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.