दिल्ली आंदोलनाचे पडसाद महाराष्ट्रभर; पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विद्यार्थ्यांचे जोरदार आंदोलन

    21-Jul-2026
Total Views |
Image Source:(Internet)

पुणे : दिल्लीतील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये विद्यार्थ्यांनी आंदोलन छेडले. पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेकडो विद्यार्थी एकत्र येत सीजेपीच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

पुण्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ विविध विद्यार्थी संघटनांचे कार्यकर्ते जमले. आंदोलकांनी हातात फलक घेत शिक्षण व्यवस्थेतील पारदर्शकतेची मागणी केली. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणीही आंदोलकांनी केली.

दरम्यान, मुंबईतील दादर येथील चैत्यभूमी परिसरातही विद्यार्थ्यांनी आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी काही आंदोलकांना ताब्यात घेतले. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांनी आवश्यक खबरदारी घेतली.

आंदोलकांनी वारंवार होत असलेल्या पेपरफुटीच्या घटनांवर तीव्र नाराजी व्यक्त करत शिक्षण व्यवस्था अधिक पारदर्शक आणि विश्वासार्ह करण्याची मागणी केली. "शिक्षण हे समाज परिवर्तनाचे प्रभावी माध्यम असून त्यावर कुठलाही आघात सहन केला जाणार नाही," अशी भूमिका विद्यार्थ्यांनी मांडली.

या आंदोलनाचे पडसाद केवळ पुणे आणि मुंबईपुरते मर्यादित न राहता नागपूर, जळगावसह राज्यातील अन्य शहरांमध्येही उमटले. विविध ठिकाणी विद्यार्थ्यांनी निदर्शने करून घोषणाबाजी केली.

दिल्लीतही आंदोलन तीव्र होत असून संसद भवन परिसरात मोर्चा पोहोचला आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला असून काही ठिकाणी आंदोलक आणि पोलिसांमध्ये धक्काबुक्की झाल्याची माहिती समोर आली आहे. महाराष्ट्रातही या घडामोडींचे पडसाद स्पष्टपणे दिसून येत आहेत.