
Image Source:(Internet)
नागपूर : वाढदिवसाचा आनंद साजरा करून काही तासही उलटले नव्हते, तोच एका कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पांडुरंगनगर येथे मालमत्तेच्या वाटणीच्या वादातून ३० वर्षीय अभिषेक धुर्वे याची सासरच्या नातेवाईकांनी क्रिकेट बॅट, काठ्या आणि धारदार शस्त्राने बेदम मारहाण करून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. गंभीर जखमी झालेल्या अभिषेकचा मेयो रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.
अभिषेक धुर्वे हा वैष्णवदेवी नगर येथील रहिवासी होता. त्याच्या आजी-सासू तुळसीबाई गायगुवाल या रेल्वेच्या निवृत्त कर्मचारी असून, त्यांच्या नावावर घर आणि इतर मालमत्ता आहे. तसेच त्यांना नियमित पेन्शनही मिळते. या मालमत्तेच्या वाटणीवरून कुटुंबात अनेक महिन्यांपासून मतभेद सुरू होते. अभिषेकची भूमिका सर्व वारसांना समान वाटा मिळावा अशी होती, तर कुटुंबातील काही सदस्य त्यास विरोध करत होते. याच वादातून अखेर रक्तरंजित संघर्ष घडल्याचे तपासात समोर आले आहे.
रविवारी अभिषेकने आपल्या कुटुंबासमवेत वाढदिवस साजरा केला. त्यानंतर रात्री उशिरा तो पांडुरंगनगर येथील तुळसीबाईंच्या घरी गेला. तेथे पुन्हा मालमत्तेचा विषय निघाल्यानंतर वादाला सुरुवात झाली. काही वेळातच वादाचे रूप हाणामारीत बदलले. यावेळी दीनानाथ निर्मलकर, संतोष गायगुवाल आणि लक्ष्मी पटेल यांनी अभिषेकवर क्रिकेट बॅट, काठ्या आणि धारदार शस्त्राने हल्ला केल्याचा आरोप आहे. या झटापटीत लक्ष्मी पटेलही जखमी झाली.
घटनेनंतर दोन्ही पक्ष कळमना पोलीस ठाण्यात पोहोचले. तेथे अभिषेकची प्रकृती अचानक खालावल्याने त्याला तातडीने मेयो रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी उपचारादरम्यान त्याला मृत घोषित केले.
या प्रकरणी मृताचा भाऊ सागर धुर्वे यांच्या तक्रारीवरून कळमना पोलिसांनी दीनानाथ निर्मलकर, संतोष गायगुवाल आणि लक्ष्मी पटेल यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. दीनानाथ आणि संतोष यांना अटक करण्यात आली असून, जखमी लक्ष्मी पटेलवर उपचार सुरू आहेत. या हत्येमागील सर्व कारणांचा पोलिसांकडून सखोल तपास सुरू असून, या घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे.