मुंबईत मुसळधार, पण विदर्भात पावसाची ओढ; नागपूरकरांची प्रतीक्षा कायम

    21-Jul-2026
Total Views |
Image Source:(Internet)

नागपूर : राज्याच्या बहुतांश भागात मान्सूनने पुन्हा जोर धरला असून मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि पुणे घाट परिसरासाठी हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली असली, तरी नागपूरसह संपूर्ण विदर्भात अद्याप दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, नागपूर, अकोला, अमरावती, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, बुलढाणा, वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यांत पुढील २४ तासांत प्रामुख्याने हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भात सध्या मुसळधार पावसाचा इशारा नसल्याने शेतकरी आणि नागरिकांची चिंता कायम आहे.

राजस्थानपासून बंगालच्या उपसागरापर्यंत तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्याच्या पश्चिम भागात पावसाला पोषक वातावरण निर्माण झाले आहे. मात्र या हवामान प्रणालींचा प्रभाव विदर्भावर तुलनेने कमी असल्याने नागपूरसह अनेक जिल्ह्यांत केवळ तुरळक सरींचाच अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

दरम्यान, पेरणीनंतर पावसाने उघडीप दिल्याने विदर्भातील शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. येत्या काही दिवसांत मान्सून विदर्भातही सक्रिय होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात असून हवामान विभागाने बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.