
Image Source:(Internet)
नागपूर : लुटीच्या उद्देशाने रचलेला डाव फसल्याने एका निष्पाप ऑटोचालकाला जीव गमवावा लागल्याची धक्कादायक घटना गोरेवाडा–पेटसूर रोड परिसरात घडली. या प्रकरणाचा अवघ्या काही तासांत छडा लावत नागपूर पोलिसांनी सहा आरोपींना अटक केली, तर एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले. त्यानंतर आरोपींची धिंड काढत पोलिसांनी गुन्हेगारांना कडक इशारा दिला.
पोलिसांच्या माहितीनुसार, मध्यरात्री आरोपींनी सुरुवातीला एका स्विगी डिलिव्हरी बॉयला लुटण्याचा प्रयत्न केला. मात्र तो त्यांच्या तावडीतून निसटला. त्यानंतर आरोपींनी ऑटोचालक मोहम्मद कासिफ याला अडवून लुटण्याचा प्रयत्न केला. कासिफने विरोध करताच आरोपींनी लोखंडी रॉड आणि इतर घातक शस्त्रांनी त्याच्यावर अमानुष हल्ला चढवला. गंभीर जखमी झालेल्या कासिफचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मानकापूर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. विशेष पथकांनी रात्रभर शोधमोहीम राबवत यश गावंडे, नवीन उईके, सुलभ उर्फ राज ठाकूर, रोहित जगदाळे, समीर उर्फ पाजी उईके आणि संजय उर्फ निलेश जोगी या सहा आरोपींना अटक केली. तसेच या गुन्ह्यातील एका अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेण्यात आले.
गुन्हेगारांमध्ये कायद्याची भीती निर्माण व्हावी आणि नागरिकांमध्ये सुरक्षिततेचा विश्वास वाढावा, या उद्देशाने पोलिसांनी सर्व आरोपींची धिंड काढली. या तडाखेबंद कारवाईमुळे नागपूर पोलिसांनी गुन्हेगारीविरोधात कठोर भूमिका घेतल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले.